रेल्वे यार्डात पाईपलाईनचे काम सुरू

By Admin | Published: April 8, 2016 12:18 AM2016-04-08T00:18:17+5:302016-04-08T00:23:04+5:30

लातूरला पाणीपुरवठा : एका आठवड्यात यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे

The work of the pipeline in the railway yard continues | रेल्वे यार्डात पाईपलाईनचे काम सुरू

रेल्वे यार्डात पाईपलाईनचे काम सुरू

googlenewsNext

मिरज : मिरजेतून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी मिरजेचे प्रांताधिकारी व तहसीलदार नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे १ कोटी १० लाख खर्चून रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येणार आहे. एका आठवड्यात लातूरला पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिरजेतून लातूरला रेल्वे पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी ५० हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर राजस्थानातील कोटा येथून मिरजेला येत आहेत. हे टँकर भरण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकाजवळील जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ५० अश्वशक्तीचा पंप बसविण्यात येणार आहे. सुमारे ८० लाख रूपये खर्चून जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत आठ इंच व्यासाची अडीच किलोमीटर लांब नवीन पाईपलाईन बसविण्यात येणार आहे. या पाईपमधून एकावेळी २५ टँकर भरण्याची व्यवस्था होणार असून ५० टँकर भरण्यासाठी दहा तास लागणार असल्याने एक दिवसाआड २५ लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे लातूरला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टँकर भरण्यासाठी रेल्वे व जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर व तहसीलदार किशोर घाडगे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जूनपर्यंत तीन महिने रेल्वे टँकरने पाणी पुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था होणार आहे. लातूर येथे रेल्वेस्थानकाजवळ मोठ्या टाक्यांत पाणी सोडण्यात येणार असून, तेथून शुध्दीकरण केंद्रात नेण्यात येईल.
मिरजेतील रेल्वे जलशुध्दीकरण केंद्रापासून पाईपलाईनचे काम उद्यापासून सुरू होणार असून, त्यासाठी रेल्वे मार्गाखालून पाईप नेण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (वार्ताहर)

रेल्वे पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी
लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिल्याने रेल्वे पोलिसांनी जादा बंदोबस्ताची तयारी केली आहे. रेल्वे टँकर रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सांगितले. लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरना रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त देण्यात येणार आहे.

Web Title: The work of the pipeline in the railway yard continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.