पूरपट्ट्यात साक्षी ग्रुप, मराठा क्रांतीचे काम उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:41 PM2019-08-22T21:41:03+5:302019-08-22T21:42:14+5:30
विविध गावातील लोकांना विशेषत: दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती. परंतु त्या वस्तीपर्यंत जाणेही जिकिरीचे होते. पाणी, चिखल तुडवत, जिवाची पर्वा न करता त्यांना मदत दिली जात होती.
जितेंद्र येवले ।
इस्लामपूर : कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पूरपस्थितीच्या काळात प्रशासनाअगोदर पोहोचून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अत्यंत नियोजनबद्ध काम करणाऱ्या संस्था व चळवळी या कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता अव्याहतपणे काम करत आहेत. खरे तर सरकार व उच्चपदस्थांनी अशा संघटनांची दखल घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील साक्षी ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना यांचे पूरस्थितीवेळचे कामकाज अत्यंत नियोजनबध्द झाले. त्यांच्या कार्याला सलाम!
वाळवा तालुक्यात पूरपरिस्थिती गंभीर होती. आता पूर ओसरला असून सर्व गावात घाण व दुर्गंधी पसरली आहे. तालुक्यातील साक्षी ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी या सेवाभावी संस्था, संघटनांच्या माध्यमातून गावा-गावातून स्वच्छता मोहीम राबवणे सुरु आहे. तसेच पूरग्रस्तांना पूरस्थितीपासून जेवण, कपडे पोहोचवण्याचे काम आजही सुरु आहे.
विविध गावातील लोकांना विशेषत: दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती. परंतु त्या वस्तीपर्यंत जाणेही जिकिरीचे होते. पाणी, चिखल तुडवत, जिवाची पर्वा न करता त्यांना मदत दिली जात होती. राष्ट्रीय महामार्गावर नद्यांचे पाणी आले होते. त्यावेळी क-हाड ते शिरोलीपर्यंत महामार्गावरील वाहतूक बंद होती. महामार्ग म्हणजे वाहनतळच बनले होते. येथे थांबलेल्या ट्रक व वाहनांतील लोकांना प्रत्यक्ष अन्न पुरवण्याचे कामही या संस्थांनी चोखपणे केले आहे.
साक्षी ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे सातारा, पाटण, महाबळेश्वर, पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या मदत साहित्याचे अत्यंत नियोजनबद्ध प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पूरबाधितांनाच वाटप केले. यामध्ये पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ व वस्तू अत्यंत गरजवंतांनाच देण्यात आल्या.
आरोग्य शिबिरातून पूरग्रस्तांची मोफत तपासणी
महिला डॉक्टर व त्यांचे पथक ठिकठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन मोफत तपासणी तसेच औषध, साबण, टूथपेस्ट व इतर आरोग्यदायी वस्तू वाटत असून, महिला व मुलींच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत देत आहेत. दहा हजारपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आली आहेत. या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बहे, साटपेवाडी, मसुचीवाडी, पर्वतवाडी, वाळवा, बनेवाडी, डिग्रज, शिरगाव, ऐतवडे खुर्द, रेठरेहरणाक्ष, काखे यासह इतर गावात अत्यंत कृतिशील व नियोजनबद्ध मदत करण्यात आली.