दुष्काळ व टंचाई स्थितीत संवेदनशीलतेने काम करा : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:42 AM2019-06-03T10:42:58+5:302019-06-03T10:45:51+5:30
सांगली : दुष्काळ व टंचाईच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे. सर्वसामान्य ...
सांगली : दुष्काळ व टंचाईच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे. सर्वसामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे आणि पशुधनाचे जीवन सुसह्य होईल, यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील चारा छावणी पाहणी व दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी नवनिर्वाचित खासदार संजय पाटील, जतचे आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद शिक्षण सभापती तम्मण्णगौडा रवी पाटील, जत व कवठेमहांकाळचे उपविभागीय अधिकारी अनुक्रमे तुषार ठोंबरे आणि डॉ. विकास खरात, जत व कवठेमहांकाळचे तहसीलदार अनुक्रमे सचिन पाटील आणि शिल्पा ठोकडे, जत व कवठेमहांकाळचे गटविकास अधिकारी अनुक्रमे अर्चना वाघमळे आणि रवींद्र कणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी लोहगाव (ता. जत) येथील कै. वसंतराव (दादा) पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आवंढी येथील आवंढी सर्व सेवा सहकारी सोसायटी तसेच सालेकिरी पाच्छापूर येथील श्री बुवानंद दुध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित, संस्थेच्या चारा छावणीस भेट देऊन पाहणी केली.
अमृतवाडी (जत) येथे बसवेश्वर दूध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे कवठेमहांकाळ तालुक्यातील चुडेखिंडी येथील लोकनेते जयसिंग (तात्या) शेंडगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या चारा छावणीस भेट दिली. तसेच, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दुष्काळाचा कलंक पुसला गेला पाहिजे, यासाठी केंद्र शासनाने उपसा सिंचन योजनांसाठी भरीव निधी दिला आहे. त्यातून अपूर्ण सिंचन योजनांचा प्रश्न मार्गी लागेल. पाणीप्रश्न सुटल्यानंतर जत तालुक्याचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून काम करत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करावे.
चारा छावण्यातील पशुधनासाठी 15 किलो ऐवजी 18 किलो चारा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनुदानातही वाढ केली आहे. चारा छावणी सुरू करण्यासाठी आवश्यक जनावरांच्या मर्यादा संख्येतही शिथिलता आणली आहे. तसेच, चारा छावण्यांतील जनावरांसाठी प्रत्येकी 35 लिटर्स मोफत पाणी पुरवठा टँकरने देण्याबाबतही शासनाने निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने यंत्रणांकडून या निर्णयांची तातडीने कार्यवाही व्हावी, असे त्यांनी सूचित केले.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढवित सहा हजार रूपये मदतीसाठीची दोन हेक्टर कमाल जमीन धारणाची मर्यादा काढून टाकण्यात आली असून आता सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या उपस्थितीत त्वरित ग्रामसभा घ्याव्यात. वंचित लाभार्थींची यादी तयार करावी. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी गटविकास अधिकारी यांना दिले.
खासदार संजय पाटील म्हणाले, चारा छावण्यातील पशुधनासाठी देण्यात येणारे पशुखाद्य चांगल्या दर्जाचे असावे. त्यासाठी संबंधितांनी त्यातील प्रथिनांचे प्रमाण तपासून घ्यावे. अपूर्ण जलसिंचन योजनांचा निधी देऊन त्यांना पूर्णत्वाला नेऊ. दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा द्यावा. तसेच, त्यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला.
जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी जत तालुक्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जत तालुक्यामध्ये सन २०१८-१९ साठी टंचाई आराखड्यामध्ये ९४ गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीला ९६ गावे व ६७५ वाड्या-वस्त्यांसाठी १०९ टँकर्सने एकूण २ लाख ३० हजार ५३२ लोकसंख्येला एकूण २६० खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जत तालुक्यात सद्यस्थितीला १८ चारा छावण्या सुरू असून ८ हजार ५०९ मोठी, १ हजार ६१८ लहान अशी एकूण १० हजार १२७ जनावरे चारा छावण्यांत आहेत.
मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये सद्यस्थितीला २६ गावे व १३६ वाड्या-वस्त्यांसाठी १७ टँकर्सने एकूण ५५ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सद्यस्थितीला ४ चारा छावण्या सुरू असून २ हजार ४६२ मोठी, ३५४ लहान अशी एकूण २ हजार ८१६ जनावरे चारा छावण्यांत आहेत.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी मांडल्या.