शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे काम आता समाधानकारक : गजानन कीर्तीकर-मिरजेत पदाधिकाऱ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:35 PM2018-04-30T23:35:27+5:302018-04-30T23:35:27+5:30
मिरज : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पक्षमेळाव्यात आपण शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती.
मिरज : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पक्षमेळाव्यात आपण शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. संघटनात्मक कार्यात दुर्लक्ष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत आपले मतभेद होतात. एखाद्या पदाधिकाºयांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. आपण पक्षहितासाठी बोललो असल्याने त्यांनी चूक सुधारून आजचा मेळावा यशस्वी केल्याने आपण जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व संजय विभुते यांच्या कार्यावर समाधानी असल्याचे खा. गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.
मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीला जनता कंटाळली आहे. याचा फायदा पर्यायी पक्ष म्हणून शिवसेनेला होणार आहे. राज्यातील सर्वच निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याने कार्यकर्त्यांनी विधानभवनावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहनही खा. कीर्तीकर यांनी केले.
खा. कीर्तीकर म्हणाले, जनतेने मोठ्या अपेक्षेने केंद्रात भाजप सरकार निवडून दिले. मात्र मोदींच्या राजवटीने जनतेचा अपेक्षाभंग केल्याने या राजवटीला जनता कंटाळली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षापेक्षा शिवसेना हा पक्षच पर्यायी पक्ष ठरणार असल्याने राज्यभरातील विधानसभा मतदार संघात पक्ष बळकटीसाठी संघटनात्मक बांधणी सुरु आहे. यासाठी संपर्कप्रमुखांच्या नियुत्या करण्यात आल्या आहेत.
मिरज शहराला अनेक पदे मिळाली, मात्र प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. मिरज शहरातील समस्या कायम आहेत. मुंबई, ठाणे या मोठ्या महापालिकांची शिवसेनेकडे सत्ता आहे. या मोठ्या महापालिकांच्या कामाचा पक्षाला अनुभव असल्याने शिवसेना सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगितले.
मेळाव्यास जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख संजय विभुते, शंभोराज काटकर, दिगंबर जाधव, शेखर माने, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, तानाजी सातपुते, पप्पू शिंदे, चंद्रकांत मैगुरे, विशाल रजपूत उपस्थित होते.
महापालिका निवडणूकही : स्वबळावर
आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याने राज्याच्या विधानभवनावर पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. यावेळी त्यांनी सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची निवडणूकही शिवसेना स्वबळावर लढविणार असून, सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचे सांगितले.