कोविड रुग्णालयात कामाचा ताण, वैद्यकीय विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 05:03 AM2020-08-02T05:03:57+5:302020-08-02T05:04:20+5:30
रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांच्या मदतीला वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थीसुद्धा काम करत आहेत.
मिरज (जि.सांगली) : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मिरजेतील कोविड रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. कोविड रुग्णसेवेच्या कामावर असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीने शासकीय रुग्णालयाच्या वसतिगृहात विषारी गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनीस सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांच्या मदतीला वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थीसुद्धा काम करत आहेत. संबंधित विद्यार्थिनीस तीन महिने कोविड प्रयोगशाळेत काम दिले होते. महिन्यापूर्वी प्रयोगशाळेतून बदली करून कोविड वॉर्डात पाठविले होते. शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा करणाºया डॉक्टरांना तीन महिने पगार मिळालेला नाही. त्यांना रजा, सुटी मिळत नाही. रुग्णसंख्या वाढली असतानाही वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. रुग्णसेवा नाकारल्यास कारवाईची भीती आहे, या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिने पत्रात लिहिले असल्याची चर्चा आहे.