Crime News in Sangli: कामगारानेच मालकाला घातला गंडा, ५५ लाखांचे सोने घेऊन झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:00 PM2022-04-28T18:00:24+5:302022-04-28T18:02:57+5:30
दोन महिन्यापासून या कामगाराला महिना १२ हजार रूपये पगारावर कामाला ठेवले होते.
विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायातील कामगाराने मालकाचे ५५ लाखाचे ९६० ग्रॅम सोने आणि रोख ५० हजार रुपये घेवून पलायन केल्याची घटना हरियाणा राज्यातील गुडगाव (गुरूग्राम) येथे शनिवारी घडली. याप्रकरणी संशयित कामगार राजेंद्र शंकर साळुंखे (मूळगाव पारे, ता.खानापूर, जि. सांगली) याच्याविरूध्द गुरूग्राम (हरियाणा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पारे येथील संताजी शहाजी जाधव यांचे अनेक वर्षापासून हरियाणा येथील गुडगाव (गुरूग्राम) शहरात ओम कॉम्प्युटर गोल्ड टेस्टींग नावाचे सोने-चांदी गलाई दुकान आहे. या दुकानात सोने खरेदी करून ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिने तयार करून दिले जातात. पारे येथील राजेंद्र साळुंखे याला दोन महिन्यापासून या कामगाराला महिना १२ हजार रूपये पगारावर कामाला ठेवले होते. त्याच्यासोबत झरे (ता.आटपाडी) येथील सचिन अशोक यादव हा कामगारही काम करतो.
साळुंखे व यादव हे दोघेही दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहण्यास होते. दि. २३ एप्रिल रोजी सचिन याने दुकानाची साफसफाई केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर संशयित राजेंद्र साळुंखे याने सचिनच्या पॅन्टमधील खिशातील कपाटातील चावी घेऊन त्यातील रोख ५० हजार रूपये व ९६० ग्रॅम वजनाचे सुमारे ५५ लाख रूपये किंमतीचे सोने घेऊन तेथून पलायन केले.
ही घटना दुकान मालक संताजी जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संशयित राजेंद्र साळुंखे याचा शोध घेतला. परंतु, तो कोठेही सापडला नाही. त्यामुळे जाधव यांनी संशयित राजेंद्र याच्याविरूध्द हरियाणा राज्यातील गुडगाव (गुरूग्राम) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पाच दिवसातील दुसरी घटना...
हिवरवाडी (जि. सातारा) येथील सूरज देशमुख यांचा राजस्थानातील सिकर शहरात सोने-चांदी व्यवसाय आहे. या दुकानात घानवड (ता.खानापूर) येथील प्रथमेश होनवार हा तरूण काम करीत होता. दुकान मालक देशमुख हे विवाहासाठी गावी हिवरवाडी येथे आले होते. त्यामुळे दुकानची सर्व जबाबदारी प्रथमेश याच्यावर सोपविण्यात आली होती. त्याने दि. १८ एप्रिल रोजी दुकानातील २ किलो ११० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पलायन केले होते.
ही घटना ताजी असताना पारे येथील सोने व्यावसायिक संताजी जाधव यांना त्यांच्याच गावातील राजेंद्र साळुंखे या कामगाराने एक किलो सोने घेऊन ५५ लाख रूपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे.