कॉँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची जुंपली
By admin | Published: October 23, 2016 12:02 AM2016-10-23T00:02:43+5:302016-10-23T00:44:02+5:30
आघाडीबद्दल मतभेद : जितेंद्र पाटील-विजय पवार यांच्यात ‘तू-तू मैं-मैं’
सांगली : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित सांगलीतील कॉँग्रेसच्या बैठकीत शनिवारी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील आणि युवक कॉँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पवार यांच्यात जुंपली.
येथील कॉँग्रेस भवनात शनिवारी दुपारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. वाळवा तालुक्यातील कॉँग्रेसअंतर्गत संघर्षाचे पडसाद शनिवारी कॉँग्रेसच्या जिल्हा बैठकीतही उमटले. जितेंद्र पाटील यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात मत मांडले. आघाडी केल्यास कॉँग्रेसला फायदा होऊ शकतो. आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडी करावी. तुल्यबळ उमेदवार पक्षाने द्यावेत, अशी सूचना मांडली.
त्यावर विजय पवार यांनी असे राजकारण बंद करा, असा संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, सोयीचे राजकारण किती दिवस चालणार? दुसऱ्याने सांगितले म्हणून आघाडी करायची आणि हवे तेव्हा स्वबळाची भाषा करायची, हे प्रकार थांबले पाहिजेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा बॅँकेत भाजपशी केलेली युती चालते आणि कॉँग्रेसने अशी युती केली की लगेच याच लोकांनी तत्त्वाची भाषा करायची. हे आता थांबवायला पाहिजे.
पवार यांनी हे मत मांडल्यानंतर राजेंद्र पाटील आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून मिरज तालुक्यातील राजकारणापर्यंतची उणी-दुणी काढण्यात आली.
दोन्ही कॉँग्रेस नेत्यांमधील हा वाद मिटविण्यासाठी प्रदेश कॉॅँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी मध्यस्थी केली. दोघांनाही शांत करून त्यांनी बैठकीची चर्चा पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. मोहनराव कदम यांनी आगामी नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार हाफिज धत्तुरे, महापालिकेतील कॉंग्रेसचे सभागृह नेते किशोर जामदार, प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, महिला कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा वहिदा नायकवडी, मालन मोहिते, सुरेश मोहिते, अमरसिंह पाटील, सुभाष खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भीमराव माने कॉँग्रेस भवनात
शिवसेनेचा राजीनामा दिलेले जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने शनिवारी अचानक कॉँग्रेस भवनात दाखल झाल्याने दिवसभर चर्चेचा विषय ठरला. यावेळी कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या कॉँग्रेस प्रवेशाचीही चर्चा रंगली होती. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माने म्हणाले की, सांगली-सातारा विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. कदम यांच्याबद्दल सर्वच पक्षातील लोकांना आदर आहे. यासंदर्भात त्यांनी कॉँग्रेस भवनमध्ये येऊन भेटण्याची विनंती केली होती. त्यामुळेच मी कॉंग्रेस कमिटीमध्ये उपस्थित राहिलो. पक्षप्रवेशाचा या उपस्थितीशी काहीही संबंध नाही.
दादा घराण्याकडून अन्याय!
जितेंद्र पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीचा दाखला देत दादा घराण्याने आमच्यावर अन्याय केला असून, उमेदवारी मिळाली असताना ऐनवेळी आम्हाला अडचणीत आणले, अशी भावना व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शैलजाभाभी पाटील यांच्यासमोरच त्यांनी हे मत मांडले.