‘तासगाव’चे कामगार राज्य बॅँकेस आज टाळे ठोकणार
By admin | Published: July 24, 2014 11:23 PM2014-07-24T23:23:38+5:302014-07-24T23:27:53+5:30
अवसायकाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी
भिलवडी : पलूस तालुका सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामामध्ये सुरू करण्यासाठी अवसायकाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी शुक्रवार दि. २५ रोजी कामगार व ऊस उत्पादन शेतकरी कोल्हापूर येथील राज्य सहकारी बॅँकेच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे.
२० जुलै रोजी तुरची (ता. तासगाव) येथे कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कामगार, सभासद व ऊस उत्पादकांच्या बैठकीमध्ये आंदोलनाचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता गोरे यांनी दिला होता.
उच्च न्यायालयाने तासगाव कारखाना अवसायकांच्या ताब्यात देण्याचे राज्य बॅँकेला आदेश दिले होते. मात्र डी. आर. ई. डी. न्यायालयात विक्री प्रक्रियेबाबत असलेली याचिका प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून अवसायकांच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य बॅँकेवर दबाव आणण्याची विनंती केली होती. पण राज्य बॅँकेचे अधिकारी आमचे ऐकत नसल्याचे सांगून हात वर केले.
शेवटचा पर्याय म्हणून कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत पहिल्या टप्प्यांमध्ये २५ जुलैला कोल्हापूर येथील बॅँकेच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार आहे. तासगाव पलूस तालुक्यातील पाचशेवर कामगार व कारखान्याचे सभासद या आंदोलनात सहभागी आहेत. (वार्ताहर)