कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे थांबले
By admin | Published: November 17, 2015 11:38 PM2015-11-17T23:38:40+5:302015-11-18T00:01:51+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीची परिस्थिती : केंद्रात व राज्यात सत्ता नसल्याचा परिणाम
प्रशांत चव्हाण-- ताकारी --केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्याने मागील वर्षभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे अखेर थांबले आहेत.राज्यात सुमारे १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्याआधीही युती सरकारमधील पाच वर्षाचा (१९९५-९९) काळ वगळता काँग्रेसचीच सत्ता होती. केंद्रातही सुमारे १० वर्षे सलग काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे ठरलेले असायचे. यात प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मुंबई दौऱ्यावर जोर असायचा. आमदार पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांचेही कार्यकर्ते महत्त्वाच्या कामासाठी मुंबईलाच जाणे पसंत करत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांचे मुंबई दौरे व्हायचे.
मात्र मागील वर्षी सत्ता गमावल्यानंतर आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचे राज्य आल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचे हे दौरे जवळपास बंद झाले आहेत. सहकारी संस्थांची कामे, अधिकाऱ्यांच्या तसेच नातेवाईकांच्या बदल्या, पदाधिकारी नियुक्ती, शिक्षण संस्थांची कामे, विविध विभागातील कंत्राट मिळविणे आदी कामांसाठी या दोन्ही पक्षांच्या तालुका व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे दौरे होत असत.
गावातील गटा-तटाच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना काही कामे मतदारसंघात सांगणे अवघड वाटत असल्याने, ते मुंबई दौरा करून आपली कामे मार्गी लावत असत. काही नेत्यांभोवती तेच ते नेते असल्याने मतदारसंघात नेत्यांना न भेटता मुंबईतच भेटणे कार्यकर्त्यांना सोयीचे झाले होते.
आमदार जयंत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचा समावेश होतो. हे पदाधिकारीही मुंबईतच तळ ठोकून असायचे.
गेल्या दहा वर्षात दर पंधरा दिवसांनी मुंबईला जाणारे काही पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांना मुंबईला जायची सवय अंगवळणी पडली होती. मात्र मागील वर्षभरापासून एकदाही मुंबईला जाण्याचा योग त्यांना आलेला नाही.
भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचे दौरे नसल्यासारखे..!
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजप-शिवसेना सत्तेवर आली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था काँग्र्रेस, राष्ट्रवादीच्याच ताब्यात असल्याने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे दौरे नसल्यासारखेच आहेत.
आता फक्त चौकशीसाठीच मुंबई वारी..!
राज्यात भाजप, शिवसेना सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बऱ्याच संस्थांची चौकशी लावली आहे. या चौकशीत बऱ्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई वारी फक्त चौकशीपुरतीच राहिली आहे.