सांगलीत दुचाकी चोरट्यांकडून दोन लाखांच्या गाड्या जप्त
By शरद जाधव | Published: October 12, 2023 07:22 PM2023-10-12T19:22:41+5:302023-10-12T19:23:26+5:30
सांगली : शहरातील शामरावनगरसह शिरोली, कऱ्हाड आणि जयसिंगपूर येथूून दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. गणेश शिवाजी ...
सांगली : शहरातील शामरावनगरसह शिरोली, कऱ्हाड आणि जयसिंगपूर येथूून दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. गणेश शिवाजी गोसावी (वय ३५, रा. रामनगर, साई मंदिराजवळ, सांगली) आणि समीर राजा देसाई (२३, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीच्या दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आल्या आहेत.
शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, शहरातील झुलेलाल चौकात एक संशयित चोरीची गाडी विक्रीसाठी थांबला आहे. त्ययानुसार पथकाने तिथे जावून गोसावी यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने शहरातील बदाम चौक परिसरातून ही दुचाकी चाेरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली त्यात चार दुचाकी मिळून आल्या. त्याच्याजवळील मोबाईलबाबत विचारणा केली त्यात त्याने विष्णूआण्णा पाटील फळ मार्केटमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. दुसऱ्या एका तपासात शामरावनगर येथून दुचाकी चोरणाऱ्या समीर देसाई यानेही दुचाकी चोरीची कबुली दिली आहे.
सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, संदीप कुंभार, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
या दोघांकडून सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी, जयसिंगपूर आणि कऱ्हाड शहरातील दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.