राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’चा डंका; राष्ट्रीय स्पर्धेसाठी मल्लांची निवड
By शीतल पाटील | Published: August 23, 2023 04:29 PM2023-08-23T16:29:47+5:302023-08-23T16:31:22+5:30
सांगली : महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय ग्रीपलिंग कुस्ती स्पर्धेत शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील पैलवानांनी ३१ ...
सांगली : महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय ग्रीपलिंग कुस्ती स्पर्धेत शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील पैलवानांनी ३१ सुवर्ण, तीन रौप्य, दोन कास्यपदकांची लयलूट करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विजयी मल्लांची निवड झाली.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील लोकरंगभूमी येथे विजयी मल्लांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्तमराव पाटील यांच्या हस्ते विजयी मल्लांना व प्रशिक्षकांना गौरविण्यात आले. शांतिनिकेतनच्या मल्लांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने मी भारावलो आहे. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून सांगलीला महाराष्ट्रात ओळख आहे. या मल्लांचे यश सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी शांतिनिकेतनचे कुस्ती प्रशिक्षक अमरजीत दहिया, पुनमचहल दहिया, पृथ्वीराज रसाळ, विजय गुरव, पूजा लोंढे आदी कुस्ती प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, डी. एस. माने, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील, क्रीडा प्रमुख तुषार बोडके उपस्थित होते.