आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया
By श्रीनिवास नागे | Published: October 7, 2022 05:47 PM2022-10-07T17:47:56+5:302022-10-07T17:49:02+5:30
आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे.
सांगली : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धेतून कुस्ती खेळाला बाहेर करण्यात आले आहे. याचा मोठा फटका भारताला बसणार असून, कुस्तीप्रेमींची निराशा झाली आहे. या निर्णयानंतर मल्ल आणि प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (सीजीएफ) आणि कॉमनवेल्थ गेम्स ऑफ ऑस्ट्रेलियाने गुरुवारी व्हिक्टोरियामधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेत नेमबाजीचा पुन्हा समावेश केला गेला, तर कुस्तीला वगळण्यात आले.
यावर्षीच्या बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने कुस्तीत सहा सुवर्णांसह १२ पदके जिंकली आहेत. आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे.
'या' खेळांचा समावेश
२०२६ मधील स्पर्धेत या खेळांचा समावेश : ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हीलचेअर बास्केटबॉल, बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, कोस्टल रोइंग, क्रिकेट टी २० (महिला), सायकलिंग (बीएमएक्स, माउंटन बाइक, रोड, ट्रॅक व पॅरा-ट्रॅक), डायव्हिंग, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बॉल, नेटबॉल, रग्बी ७, नेमबाजी, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, पॅरा-ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग.
जागतिक क्रीडाक्षेत्राचा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. कुस्तीला वगळण्याचा निर्णय योग्य नाही. अशा निर्णयामुळे मल्लांचे खच्चीकरण होणार आहे. त्यांच्यावर हा अन्यायच आहे. नवे खेळाडू या खेळाकडे कसे वळतील? कुस्ती नामशेष होण्याचा धोका आहे. याविरोधात देशभर उठाव झाला पाहिजे. - राम सारंग, राष्ट्रकुल पदक विजेते मल्ल आणि प्रशिक्षक, कोल्हापूर.
कुस्ती हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा खेळ आहे. तो टिकला पाहिजे. कुस्तीला वगळणे निषेधार्ह आहे. या स्पर्धेतून पैलवान ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करतात. भारतीय पदकतालिकेत मोठी भर पडते. खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कुस्तीचा समावेश पुन्हा व्हावा यासाठी आपल्या ऑलिम्पिक महासंघाने पाठपुरावा केला पाहिजे. - नरसिंग यादव, ‘अर्जुन’वीर, राष्ट्रकुल पदक विजेते मल्ल