सांगली महापालिका अभियंत्याची पुन्हा होणार लेखी परीक्षा, आयुक्तांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:41 PM2024-06-22T12:41:47+5:302024-06-22T12:42:28+5:30

अपेक्षित गुण न मिळाल्यास वेतनवाढ रोखणार

Written exam of Sangli Municipal Engineer to be held again, Commissioner order  | सांगली महापालिका अभियंत्याची पुन्हा होणार लेखी परीक्षा, आयुक्तांचे आदेश 

सांगली महापालिका अभियंत्याची पुन्हा होणार लेखी परीक्षा, आयुक्तांचे आदेश 

सांगली : महापालिकेतील बांधकाम विभागातील कार्यपद्धतीबद्दल अभियंत्याकडून कार्यवाही होत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सर्वच अभियंत्याची लेखी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता २५ जूनला रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी आता अभियंत्यांनी अभ्यास सुरू केला आहे.

परीक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे बंधनकारक असून, त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास संबंधित अभियंत्याच्या दोन वेतनवाढी रोखण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. याबाबतचे आदेश आयुक्त गुप्ता यांनी सर्व कार्यालयातील अभियंत्यांना दिले आहेत.

महापालिकेतील बांधकाम, नगररचना यासह प्रभाग समित्या कार्यालयातील सर्व विभागांतील कायम, मानधनावरील अभियंते यांच्याकडे विविध भागांतील कामाची जबाबदारी आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कामाविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडून समाधानकारक कामही होताना दिसत नाही.

महापालिकेचे आयुक्त गुप्ता यांनी स्थायी आदेशाद्वारे बांधकाम विभागाची कार्यपद्धती निश्चित करून करावयाचे कामकाजाबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार अभ्यास करून बांधकाम विभागातील अभियंत्यांनी कार्यवाही करणे आवश्यक होते. ६ जून रोजी बांधकाम विभागाकडील चालू, अपूर्ण, पूर्ण कामांबद्दल घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत शाखा अभियंता व इतर अधिकारी यांनी स्थायी आदेश वाचन केले नसल्याचे तसेच नियमातील तरतुदींची माहिती नसल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब प्रशासकीय दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

शहर अभियंता कार्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयाकडील सर्व कायम, मानधनावरील कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, नगर अभियंता, उपअभियंता यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा मंगलधाम येथे दि. २५ जून रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.

परीक्षेस सर्व अभियंत्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक असून, त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास संबंधित अभियंत्यांच्या दोन वेतनवाढी रोखण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.

Web Title: Written exam of Sangli Municipal Engineer to be held again, Commissioner order 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.