लाॅकडाऊनच्या काळात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:38+5:302021-02-14T04:24:38+5:30
शिराळा : लॉकडाऊनमध्ये अनेकांनी वेगवेगळे छंद जोपासले; मात्र शिराळा येथील शिवाजी वसंतराव शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने ...
शिराळा : लॉकडाऊनमध्ये अनेकांनी वेगवेगळे छंद जोपासले; मात्र शिराळा येथील शिवाजी वसंतराव शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढली आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरात बसून काय करायचे? हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. यातून शिवाजी शिंदे यांना ज्ञानेश्वरी लिहायची कल्पना सुचली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली.
जवळपास अडीच महिन्यांत संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आहे. इथून पुढे अनेक वर्षे २०२० साल लक्षात राहील. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे नातेसंबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांचे जगणे बदलून गेले आहे; पण या लाॅकडाऊनला सकारात्मक घेऊन शिवाजी वसंतराव शिंदे यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने लिहून पूर्ण केली. शिंदे यांना भजनाची आणि ज्ञानेश्वरी वाचनाची आवड आहे. त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात बाॅलपेनच्या साहाय्याने, हाताने ४०० पानी वहीवर ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा ते बारा तासांपर्यंत एका जागेवर बसून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे.
ज्ञानेश्वरी वाचून समजत नव्हती; म्हणून लिहून काढली. यामुळे आता ज्ञानेश्वरी चांगली समजू लागली आहे, असे ते सांगतात. ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन त्यांना रघुनाथ मारुती कदम यांच्याकडून मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून रघुनाथ कदम हे अखंड ज्ञानेश्वरी वाचन करीत आहेत. एकादशी, द्वादशी, रविवार, गुरुवार असे चार दिवस त्यांच्या घरी भजन असते. अनेक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले आहे. त्यांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली होती.
फोटो-१३शिराळा१