वायफळच्या दिव्यांगाने कळसुबाई शिखर केले सर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:33 PM2019-04-11T23:33:49+5:302019-04-11T23:33:55+5:30
सांगली : वायफळ (ता. जत) येथील दिव्यांग अंकुर दुर्योधन यादव-पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च कळसुबाई शिखर ...
सांगली : वायफळ (ता. जत) येथील दिव्यांग अंकुर दुर्योधन यादव-पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले. दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५४०० फूट प्रवास करीत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. त्यांना नाशिकचे अंध सागर बोडके यांनी साथ दिली.
सागर बोडके यांनी वर्षातून २१ वेळा कळसुबाई शिखर सर केले आहे. अंध असूनही त्यांची ही जिद्द पाहून अंकुर यादव यांनी हे शिखर सर करण्याची मनीषा व्यक्ती केली होती. ७ एप्रिल रोजी बोडके यांची अकरावी फेरी होती. त्यांनी यादव यांना मोबाईलवर संपर्क साधून, ‘येणार आहे का’, अशी विचारणा केली. यादव यांनी होकार दिला. बोडके यांच्यासोबत शिखर सर करण्याची त्यांना संधी मिळाली होती. नाशिकहून प्रवास करून पायथ्याच्या बारी गावातून सकाळी सहा वाजता बोडके व यादव निघाले. जहाँगीरवाडीच्या माची मंदिरात कळसूमातेचे दर्शन त्यांनी घेतले. पाठीला सात ते आठ किलो साहित्य असलेली बॅग घेऊन शिखर सर करण्याचा त्यांचा प्रवास सुरु झाला. बोडके हे यादव यांना सांभाळत मुख्य वाटेला लागले. पुणे-मुंबईतील बरेच ग्रुप आले होते. एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडीमार्गापर्यंत ते पोहोचले. तोल सावरत, कधी बोडके यांचा हात धरुन, तर कधी दोघे मागे-पुढे होत शिखर सर केले. वाटेत भेटणाऱ्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छाही दिल्या. १३६० मीटर उंची गाठल्यानंतर झाडाखाली दोघेही विसावले. पाणी पिऊन पुन्हा ते पुढील प्रवासाला लागले. सकाळी ेदहा वाजता १६४० मीटर उंचीचे (५ हजार ४०० फूट) सर्वोच्च कळसुबाई शिखर त्यांनी सर केले.
परतीचा प्रवासही तसाच
बोडके व यादव यांचा परतीचा प्रवासही तसाच झाला. बारा वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. दुपारी तीन वाजता ते शिखरावरुन उतरले. कळसूमातेच्या दर्शनाची आस व जिद्दीने शिखर सर केल्याचा यादव यांना आनंद झाला. हे शिखर सर करताना दिव्यांग आहोत, हे विसरून गेल्याचे त्यांनी सांगितले.