वाई घाटात पोत्यांचा; खंबाटकीत बॅरेलचा आधार

By admin | Published: March 8, 2017 11:25 PM2017-03-08T23:25:01+5:302017-03-08T23:25:01+5:30

धोकादायक वळणांचा प्रवास : स्थानिकांसह पर्यटकांचाही जीव धोक्यात, तातडीने उपाययोजना करण्याची प्रवाशांमधून मागणी

Y ghat bags; Baseball backbone | वाई घाटात पोत्यांचा; खंबाटकीत बॅरेलचा आधार

वाई घाटात पोत्यांचा; खंबाटकीत बॅरेलचा आधार

Next



संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी वाहनांच्या अपघातानेच संरक्षक कठडे ढासळले आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो रुपयांचे वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी पसरणी घाटात खतांच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कठडा तोडून दोनशे फूट दरीत कोसळला आहे. चालक हाच मालक होता त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून भरलेला ट्रक आजही दरीतून बाहेर काढलेला नाही. गाडीत असलेली खतांची पोती चोरीला गेली.
पसरणी घाटात दरवर्षी शेकडो अपघात बांधकाम विभागाच्या गलथान पणामुळे झालेले आहेत. याला जबाबदार कोण?, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

वाई : निसर्ग सौंदर्याने भरभरून दिलेल्या महाबळेश्वर, पाचगणी परिसराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटनाचा दर्जा आहे. मात्र, येथे येणाऱ्या पर्यटकांचा जीव आता धोक्यात जाण्याची भीती दिसत आहे. पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे कोसळले आहेत. या कठड्यांच्या जागी संबंधित विभागाने चक्क वाळूची पोती लावली आहेत. रात्रीच्या वेळी या अरुंद घाटातून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. गेल्या महिन्याभरात पन्नासहून अधिक गाड्या या दरीत गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अनेक ठिकाणी विविध वाहनांच्या अपघाताने व पावसामुळे संरक्षक कठडे ढासळलेले आहेत. पसरणी घाटातील ढासळलेले कठडे अपघातास निमंत्रण देत आहेत. घाटात सध्या अपघाताची मालिका सुरू असून, त्यात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जीव मुठीत घेऊन वाईतून पाचगणीला जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मुळातच अरुंद घाट असल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब होऊन बसली आहे. सध्या परीक्षांचा काळ असला तरी पाचगणी महाबळेश्वरचा हंगाम तोंडावर आल्याने संबंधित विभागाने पसरणी घाटातील सर्व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असताना बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा हा प्रवाशांच्या मुळावर उठला आहे. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास पसरणी घाटात अतिशय विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवून घाटातील संरक्षक भिंत दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी आहे.
संबंधित विभागाच्या मेहरबानीने पसरणी घाटाची ओळख सध्या ‘डेंजर घाट’ म्हणून झाली आहे. ही ओळख पुसण्यासाठी बांधकाम विभागाने लागणाऱ्या निधीचे कारण पुढे न करता त्वरित हालचाल करून संरक्षक कठड्यांची उभारणी करून प्रवाशांची होणारी परवड थांबवावी व ढासळलेल्या कठड्याच्या ठिकाणी त्वरित उपाययोजना कराव्यात. ढासळलेल्या कठड्यांना फक्त वाळूने भरलेल्या पोत्यांचा आधार आहे.
संबंधित विभागाने डोळ्यावर पट्टी न बांधता त्वरित घाटातील दुरुस्तीची कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे. तसेच दररोज पाचगणी-महाबळेश्वरला जाणाऱ्या नोकरदार व शाळेसाठी जाणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही तर पाचगणीकरांना वाई शहरातील मार्केट जवळ असल्याने या घाटातून वाहतूक बऱ्यापैकी सुरू असते. दर शनिवारी, रविवारी या सलग सुट्यांदिवशी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याने दोन किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच ढासळलेल्या कठड्यांची भीती मनात धरूनच या घाटातून प्रवास करावा लागतो. (प्रतिनिधी)

Web Title: Y ghat bags; Baseball backbone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.