येळापूरच्या तरुणाकडून भावजय, पुतण्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:28 AM2019-09-11T00:28:41+5:302019-09-11T00:28:45+5:30
कोकरूड/पनवेल : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठे शहरात ...
कोकरूड/पनवेल : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठे शहरात सोमवारी रात्री उशिरा उघड झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात
आली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. जयश्री योगेश चव्हाण (वय २२) व अविनाश चव्हाण (२) अशी हत्या झालेल्यांची नावे
आहेत.
योगेश चव्हाण (मूळ गाव चव्हाणवाडी, येळापूर, ता. शिराळा) हे कामानिमित्त कामोठे सेक्टर ३४ येथील एकदंत सोसायटीतील रूम नंबर ३०४ मध्ये पत्नी जयश्री (२२), मुलगा अविनाश (२) व भाऊ सुरेश (३०) यांच्यासह राहतात. योगेश हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असून सोमवारी ते कामावर गेले होते. सुरेश हा योगेशचा मोठा भाऊ असून अविवाहित आहे. त्यांचे आई-वडील हे गणपतीसाठी शिराळा, सांगली या आपल्या गावी गेले होते.
सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते. आई-वडील व भावासोबत भांडण होत असे. त्यातून काही दिवसांपूर्वी योगेशने सुरेशला घराबाहेर काढले होते. याच गोष्टीचा प्रचंड राग सुरेशच्या मनात होता. तोच राग मनात ठेवून सोमवारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सुरेश योगेशच्या घरी गेला. भावजय जयश्रीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जयश्रीला ठार मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जयश्रीचा दोन वर्षाचा मुलगा अविनाश याच्यावरही राग काढला. उशीने तोंड दाबून त्याचाही जीव घेतला. या प्रकारानंतर सुरेश घरात बसून राहिला व झोपी गेला.
सोमवारी रात्री ११ च्या सुमारास योगेश घरी आल्यानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुरेश हॉलमध्ये झोपला होता तर जयश्री व मुलगा अविनाश यांचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले. त्यामुळे योगेशने कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून सुरेशला अटक केली आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे कामोठे पोलिसांनी सांगितले.
जयश्रीचा छळ झाल्याचा नातेवाइकांंचा आरोप
जयश्री व अविनाश यांची सुरेशने दुपारीच हत्या केल्याचे समोर आले आहे. जयश्रीचे माहेर आटूगडेवाडी-मेणी (शिराळा, सांगली) येथील असून, तिचे योगेश सोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चव्हाण कुटुंबीय १५ वर्षांपासून कामोठे येथे राहत आहेत, तर सासरी जयश्रीचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.