बेदाण्याची पट्टी २१ दिवसात मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:05 PM2017-08-11T23:05:13+5:302017-08-11T23:05:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बेदाण्याचा सौदा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत शेतकºयांना नियमानुसार पट्टी देण्यात यावी, अन्यथा व्यापाºयांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सांगली बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिला. सौद्यावेळी करण्यात येणारी बेदाण्याची उधळण थांबविण्यास व्यापाºयांनी सहमती दर्शविली. बेदाणा बॉक्सच्या पैशाबाबत राज्यातील पाच बाजार समित्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी व शेतकºयांची शुक्रवारी संयुक्त बैठक झाली. सभापती प्रशांत शेजाळ, सचिव प्रकाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, संदीप राजोबा, व्यापारी प्रतिनिधी सुशील हडदरे, मुजीर जांभळीकर, प्रशांत पाटील-मजलेकर उपस्थित होते.
स्वाभिमानी श्ेतकरी संघटनेने बेदाण्याला हमीभाव मिळावा, बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत पैसे द्यावेत, सौदे करत असताना बेदाण्याची उधळण थांबवावी आदी मागण्या बाजार समितीकडे केल्या होत्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत शेतकºयांना पैसे द्यावेत, अशा सूचना सभापती शेजाळ यांनी व्यापाºयांना दिल्या. विलंबाने पैसे दिले, तर शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर संबंधित व्यापाºयांवर कारवाई केली जाईल.
सौद्यावेळी बेदाण्याची होणारी उधळण थांबविण्यात येईल, असे व्यापाºयांनी बैठकीत मान्य केले.
बाजार समितीमध्ये हळद संशोधन केंद्र आहे, त्याच धर्तीवर बेदाण्याचे संशोधन केंद्र उभे करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, लवकरच त्याला मान्यता मिळेल. यामुळे बेदाण्यासाठी वापरण्यात आलेले गंधकाचे प्रमाणात समजण्यास मदत होईल. त्यातून चांगल्या बेदाण्याला वाढीव दर मिळेल.
शेतकºयांच्या बेदाण्याची अडीचशे ग्रॅमपेक्षा जादा घट धरली जाते, त्याबाबत आक्षेप घेण्यात आला. त्यावर अडीचशे ग्रॅमपेक्षा जादा घट धरली जाणार नाही, अशी ग्वाही व्यापाºयांनी बैठकीत दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडाफोडीचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. व्यापाºयांत घबराट निर्माण होईल, अशा पद्धतीने आंदोलन करू नये, अशी विनंती संघटनेला करण्यात आली.
शेजाळ म्हणाले की, शीतगृहावर बेदाण्याचे सौदे होतात. मात्र, यामध्ये मोठ्याच शेतकºयांच्या बेदाण्याला अधिक दर मिळतो. यावर बाजार समितीचे नियंत्रण असावे, अशी मागणी केली आहे. त्यानुसार शीतगृह चालकांशी बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार आहे. त्याचप्रमाणे बेदाणा बॉक्सचे पैसे शेतकºयांना द्यावे लागत आहेत. याबाबत सांगली, तासगाव, पिंंपळगाव, पंढरपूर या बाजार समित्या एकत्र येऊन १ सप्टेंबरला बैठक घेण्याचा निर्णय झाला.
सप्टेंबरमध्ये हैदराबादला बैठक : शेजाळ
बेदाणा, हळद हा शेतीमाल आहे. बेदाणा आणि हळदीला केंद्र सरकारने जीएसटी लागू आहे. याचा परिणाम व्यवहारांवर झाला आहे. यामुळे जीएसटी वगळण्यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार आहे. शनिवार (ता. ९) सप्टेंबरला हैदराबाद येथे जीएसटीबाबत बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीला बाजार समितीचे पदाधिकारी जाणार आहेत. त्यात बेदाणा आणि हळदीवरील जीएसटी वगळा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी सांगितले.