यशवंत कारखाना भारती शुगर्सच्या ताब्यात, विक्री व्यवहार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:22 PM2023-05-18T23:22:49+5:302023-05-18T23:22:57+5:30
जिल्हा बँकेची पूर्ण थकबाकी भरली
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भारती शुगर्स अँण्ड फ्युअल्स कंपनीच्या ताब्यात गेला असून खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने जिल्हा बँकेची थकबाकी भरून नंतर या कारखान्याचा विक्री व्यवहार भारती शुगर्सबरोबर केला आहे. त्यामुळे चालू हंगामातच हा कारखाना सुरू होणार आहे.
गत मार्च महिन्यात जिल्हा बँकेत यशवंत कारखान्याच्या ओटीएस योजनेवरून राजकारण पेटले होते. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी कारखान्याला एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्यास विरोध दर्शविला होता. यशवंत कारखाना हा खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील गणपती संघाकडे होता. त्यामुळे बाबर यांच्या विरोधानंतर त्यांच्याशी बँकेने चर्चा केली होती. तांत्रिकदृष्ट्या एकरकमी परतफेड योजनेसाठी यशवंत साखर कारखाना पात्र ठरत असल्याने बँकेने कारखान्याला एकरकमी परतफेड योजनेतील सहभागाचे पत्र दिले होते. एकूण २२ कोटींच्या थकबाकीपैकी सुमारे १२ कोटींची थकबाकी कारखान्याला भरावी लागणार होती. ही थकबाकी भरून गणपती संघाने कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यातून सोडविला. त्यानंतर लगेचच भारती शुगर्सला तो विकला आहे.
वाढत्या थकबाकीमुळे यशवंत कारखाना बँकेने ताब्यात घेतला होता. कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. दुसरीकडे आमदार बाबर यांनी कारखान्याच्या विक्रीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. बड्या कर्जांच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने ओटीएस योजना सुरू केली आहे. यशवंत कारखान्याच्या थकबाकीसाठी या योजनेमध्ये खासदार पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.
कारखाना बँकेच्या कर्जातून मुक्त झाल्यानंतर लगेचच तो भारती शुगर्सला देण्यात आला आहे. भारती शुगर्समार्फत येणाऱ्या हंगामातच तो सुरू करण्यात येणार आहे. याबाबत भारती शुगर्सचे संचालक महेंद्र लाड यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
कंपनीकडून कर्मचारी भरती
भारती शुगर्सने कर्मचारी भरतीची तयारी केली आहे. येत्या १९ व २० मे रोजी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मुख्य अभियंता पदापासून सुरक्षा रक्षकांपर्यंत एकूण ३१ पदांची भरती केली जाणार आहे.
हा कारखाना सुरू होत असल्याचा आनंद आहे. भारती शुगर्सच्या संचालकांनी कर्मचारी भरती करताना श्रमिक संघाच्या स्थानिक कामगार पदाधिकारी, सभासदांना विश्वासात घ्यावे. त्यांच्याशी संवाद साधावा. योग्य व पात्र कामगारांना संधी दिल्यास त्यात चालकांचाही फायदा आहे. -भाऊसाहेब यादव, सभासद, श्रमिक संघ