थकीत पगारासाठी यशवंत कारखान्याच्या कामगारांचा विट्यात महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 06:17 PM2023-03-07T18:17:00+5:302023-03-07T18:17:32+5:30
गेल्या ३५ दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
दिलीप मोहिते
विटा : नागेवाडी (ता.खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा बँकेकडे असलेले पगाराचे पैसे कामगारांना देण्यास बँक व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ कामगारांनी काल, सोमवारी कुटुंबियांसह विटा तहसील कार्यालयावर महामोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या कामगारांनी बँक व्यवस्थापना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले.
विटा तहसील कार्यालयासमोर दि. १ फेब्रुवारीपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. यशवंत कारखान्याच्या कामगारांचे ८ कोटी २८ लाख रूपये जिल्हा बँकेत आहेत. ते पैसे बँक वापरत आहे. परिणामी, कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही त्याकडे प्रशासनासह बँक व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे.
यापार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या कामगारांनी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे, शेकापचे सरचिटणीस अॅड. सुभाष पाटील, भाऊसाहेब यादव, आनंदराव नलवडे, गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलवर महामोर्चा काढला. यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून सुरू झालेला हा महामोर्चा मायणी रोड, पेट्रोलपंप, प्रसाद चित्रमंदीर, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला.
त्यावेळी कामगारांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी कामगारांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. बँकेने थकीत पगाराचे पैसे कामगारांना द्यावेत, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला. यानंतर तहसीलदारांना आंदोलनकर्त्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. या मोर्चात अरूण धेंडे, सुदाम काळे, सुखदेव कुंभार, हणमंत घोरपडे, बाळासाहेब वाघमोडे, शाहीर यादव, अनिल महाडीक यांच्यासह कामगार व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते.