जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:44 PM2018-10-26T23:44:14+5:302018-10-26T23:44:18+5:30
मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव ...
मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी गौरव केला. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिराळा, आटपाडी पंचायत समितीसही बक्षीस देण्यात आले.
मुंबईतील रवींद्र नाट्यगृृहात यशवंत पंचायत राज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते झाले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. यशवंत पंचायत राजमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. शिराळा पंचायत समितीने राज्यपातळीवर, तर आटपाडी पंचायत समितीने पुणे विभागात प्रत्येकी तिसरा कमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
राज्यातील पंचायत राज संस्था या राज्याच्या ग्रामीण, निमशहरी, शहरी भागाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. राज्यात शासनाच्या अनेक विकास योजना या पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्या जात आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.
स्वच्छ भारत अभियानात सांगली जिल्हा परिषदेस १२ पैकी १२, तर सामान्य प्रशासन विभागास ११ गुण मिळाले आहेत. एकूण १०० गुणांपैकी जिल्हा परिषदेस ८१ गुण मिळाले. अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यापासून कामाला गती दिली. कोणतेही चुकीचे अथवा वादगस्त काम होणार नाही, याकडे लक्ष दिले. दिव्यांग अभियानासारख्या राज्यासमोर आदर्श ठरलेल्या नावीन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या.
यावेळी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, तम्मणगौडा रवी-पाटील, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे, शिराळा पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंह नाईक, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बी. के. नायकवडी, वैशाली माने, आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती तानाजी यमगर, गटविकास अधिकारी मीनाक्षी साळुंखे यांच्यासह खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे स्थान बळकट : देशमुख
राज्यात मिळालेल्या पहिल्या स्थानामुळे जिल्हा परिषदेचे स्थान आणखीनच बळकट होऊन पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाºयांचा आत्मविश्वास आणखीनच बळावल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. दिव्यांग अभियान राज्यासमोर आदर्श नावीन्यपूर्ण योजना ठरली. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर जिल्हा परिषदेने जोरदार काम केल्याने यश मिळाले.