आरेवाडीतील बिराेबा देवाची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:24+5:302021-04-07T04:28:24+5:30
ओळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिराेबा यात्रा रद्द करण्यासंदर्भात आयाेजित बैठकीत तहसीलदार बी.जे. गोरे यांनी मार्गदर्शन केले. या ...
ओळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिराेबा यात्रा रद्द करण्यासंदर्भात आयाेजित बैठकीत तहसीलदार बी.जे. गोरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलीस पाटील रामचंद्र पाटील, माजी सभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच आबासाहेब साबळे, रावसाहेब कोळेकर उपस्थित हाेते.
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा रद्द करण्यात आली असून कोणीही गर्दी जमवून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार बी.जे. गोरे यांनी दिला आहे.
आरेवाडी येथील बिरोबा बनातील भक्त निवासमध्ये प्रशासन, देवस्थान समिती व पुजारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या वेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे उपस्थित होते.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवाची यात्रा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याची वेळ आली आहे. बिरोबा देवाची यात्रा पाडव्यापासून सुरू होते. पाडव्याच्या सातव्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. यात्रास्थळी दरवर्षी सुमारे चार लाख भाविक हजेरी लावतात.
बैठकीत तहसीलदार गोरे म्हणाले, मंदिराच्या आवारात असणारी सर्व दुकाने तातडीने बंद करा, मंदिरातील दर्शन पूर्णपणे बंद ठेवा, देवाच्या विधीसाठी फक्त पाच व्यक्तींनाच मंदिरात थांबता येईल. मंदिर बंद असल्याचे चारी बाजूंना फलक लावा, येणारी अमावस्याही भरवली जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस पाटील, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांची असेल. यात्रेच्या मुख्य दिवशीच फक्त विधीसाठी पाच पुजाऱ्यांना परवानगी असेल.
पाेलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे म्हणाले, प्रशासन कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून रात्रंदिवस काम करत आहे. कायद्याचे उल्लंघन केले तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, पोलीस पाटील रामचंद्र पाटील, सरपंच आबासाहेब साबळे, कोंडीबा कोळेकर, गावकामगार तलाठी कल्पना आंबेकर, उपसरपंच बिरू कोळेकर, दादा कोळेकर यांच्यासह पुजारी उपस्थित होते.