गव्हाणच्या लक्ष्मी देवीची यात्रा दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:40+5:302021-05-25T04:29:40+5:30
गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथील बुधवार दि.२६ व गुरुवार दि.२७ मे रोजी होणारी ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची ...
गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथील बुधवार दि.२६ व गुरुवार दि.२७ मे रोजी होणारी ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व यात्रा कमिटीतर्फे निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच हणमंत पाटील यांनी दिली आहे.
बुधवारी पहाटे मंदिराचे पुजारी रामचंद्र गुरव श्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजा करतील. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
येत्या २६ आणि २७ मे रोजी गव्हाणचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा असून दरवर्षी वैशाख शुद्ध पौर्णिमेला गव्हाण गावची यात्रा भरते. आसपासच्या परिसरातील सर्वात मोठी यात्रा असते. सलग दुसऱ्या वर्षी परगावी असणाऱ्यांना यात्रेपासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी हे लोक वर्षातून एकदा गावी यात्रेसाठी सर्वजण एकत्र येत असतात. ऐन उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवसात यात्रा असल्याने यात्रेला मोठी गर्दी असते. कोरोना विषाणूच्या साथीला अटकाव घालण्यासाठी लाॅकडाऊन लागू झाल्यापासून गावात शासनाचे आदेश व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडू नये, यासाठी एक बैठक घेण्यात आली. यामध्ये श्री लक्ष्मी देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात्रेनिमित्त होणारे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठी अथवा नैवेद्य घेऊन कोणीही गर्दी करू नये अथवा फिरू नये, अशी विनंती कमिटीने केली आहे. यात्रेच्या दोन्ही दिवशी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच हणमंत पाटील, उपसरपंच रावसाहेब सरवदे, विजय जाधव, विठ्ठल काशीद, विजय पवार, ग्रामसेवक संजय देशमुख, तलाठी शिवाजी चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी पाटील, विनायक पाटील, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.