यंदा भिलवडीसह सोळा गावांत ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:31 AM2021-09-09T04:31:50+5:302021-09-09T04:31:50+5:30
भिलवडी : भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सोळा गावांत यावर्षी कोणतेही मंडळ सार्वजनिक गणपती बसविणार नाही, तर प्रत्येक गावात ‘एक ...
भिलवडी : भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सोळा गावांत यावर्षी कोणतेही मंडळ सार्वजनिक गणपती बसविणार नाही, तर प्रत्येक गावात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिली.
पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भिलवडी, माळवाडी, धनगाव, अंकलखोप, नागठाणे, संतगाव, सूर्यगाव, चोपडेवाडी, सुखवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडीस्टेशन, बुरुंगवाडी, हजारवाडी, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ या सोळा गावांचा समावेश आहे. भिलवडी पोलिसांनी प्रत्येक गावा-गावात जाऊन ग्रामपंचायत पदाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीसपाटील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, बँजो, बँडवाले, लाईट मंडप, डेकोरेशनवाले, मूर्तीकार यांची बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमावलींचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन कैलास कोडग यांनी केले. या आवाहनास प्रतिसाद देत सर्व ग्रामपंचायतींनी ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविणार असल्याबाबत लेखी पत्र पोलीस प्रशासनास दिले. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सोळा गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.