वर्षभरातील शिक्षण आणि क्रीडा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:33+5:302020-12-29T04:25:33+5:30
डिजिटल शिक्षणाला मिळाले बळ, हे वर्ष ड्रॉपचेच कोरोनाने यंदा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची परीक्षा घेतली असेच म्हणावे लागेल. ऑनलाईन शिक्षण ...
डिजिटल शिक्षणाला मिळाले बळ, हे वर्ष ड्रॉपचेच
कोरोनाने यंदा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची परीक्षा घेतली असेच म्हणावे लागेल. ऑनलाईन शिक्षण परवलीचे बनले. एरवी मोबाईलपासून मुलांना दूर ठेवणाऱ्या पालकांनी स्वत:हून मोबाईल हाती दिले. मोबाईलच्या चौकटीत दिवसभर डोळे खुपसून बसलेली मुले असे चित्र घरोघरी होते. त्याचवेळी अनेक शिक्षकांनी कल्पक प्रयोग राबवित शिक्षण मुलांपर्यंत पोहोचविले. शिराळ्यासारख्या दुर्गम भागात रेंज नसल्याने शिक्षकच घराघरांत गेले. पाच-दहा मुलांना एकत्र करून पुस्तकात रमविले. दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग भरले तरी उपस्थिती अजूनही ३५-४० टक्क्यांवरच आहे.
लॉकडाऊन आणि मराठा आरक्षणाच्या घोळामुळे पदविका अभियांत्रिकी व आयटीआयचे प्रवेश अभूतपूर्व असे लांबले. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग अजूनही सुरू झालेलेल नाहीत. परीक्षेविना पदवी ही न पटणारी संकल्पनाही स्वीकारावी लागली. या अंधारातही शिक्षणाच्या नव्या वाटा शिक्षक व विद्यार्थ्यांनी शोधल्या. मोबाईलवर लाईव्ह वर्ग भरले.
खासगी शिक्षण संस्था व तेथील शिक्षकांसाठी मात्र हे वर्ष अत्यंत त्रासदायी ठरले. अनेकांचे पगार थांबले, नोकऱ्याही हिरावल्या. खासगी शिक्षकांनी अन्य व्यवसाय पत्करले. खासगी शिकवणी चालकांचाही अर्थप्रवाह थांबला. स्कूल बसेस, गणवेश, पुस्तके, स्टेशनरी व्यावसायिक या सर्वांच्या वाटेला अत्यंत दु:खदायी वर्ष आले.
----------
क्रीडा
कोरोनाने दिली धोबीपछाड
खेळाच्या मैदानांवर यंदा डाव रंगलेच नाहीत. शालेय क्रीडा स्पर्धा, महापौर चषक फुटबॉल, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा या सर्वांना ‘खो’ बसला. अनेक खेळाडूंना वयोमर्यादा ओलांडल्याने पुढील वर्षाच्या स्पर्धेला मुकावे लागेल. कुंडल, बांबवडे येथील कुस्ती मैदाने रद्द करावी लागली. तालमींना कुलपे लागल्याने पैलवानांचा सरावही थांबला. व्यायामशाळा बंद राहिल्याने घरच्या घरी व्यायाम करण्याची वेळ आली. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव ओस पडला. क्रीडा संकुल कोविड सेंटरसाठी घेतल्याने खेळाडूंच्या प्रवेशावरही निर्बंध आले. मैदाने लॉकडाऊन झाल्याने गल्ली क्रिकेट सुरू झाले. टेनिस बॉलवर हाफ पीच क्रिकेट स्पर्धा रंगल्या. सांगलीत तरुण भारत मंडळाची खो-खो स्पर्धा होऊ शकली नाही. क्रिकेटपटू स्मृती मानधना हिलाही सराव कायम ठेवण्यासाठी सांगलीतील क्रीडांगणावर बॅटिंग करावी लागली.
खेळांची कसर ऑनलाईन गेमवर भरून काढावी लागली. यात्रा-जत्रा रद्द झाल्याने तेथील कुस्ती मैदाने रद्द झाली. शेकडो पैलवानांना शेतातच घाम गाळावा लागला. त्यामुळे यंदा सर्व मैदानांवर कोरोनाचेच राज्य राहिले असेच म्हणावे लागेल.
-------------