सातारा येथे यंदाचा गणेशोत्सव शासन आदेशानुसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:22 PM2020-05-31T14:22:57+5:302020-05-31T14:25:58+5:30
रामचंद्र शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुुळे गणेशोत्सव व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन सध्यातरी कोणी करू नये.
सातारा : कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले असून, गणेशोत्सवावरही त्याचे सावट आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा की नाही, याबाबत शासन निर्णय घेईल. तत्पूर्वी जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळ व मूर्तिकारांची बैठक घेऊन उत्सवाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. मूर्तिकारांनीही यंदा कमी उंचीच्या व शाडूच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन अतिरिक्त उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोेलीस अधीक्षक धीरज पाटील, माजी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, राजू गोडसे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांच्यासह मूर्तिकार उपस्थित होते.
रामचंद्र शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुुळे गणेशोत्सव व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन सध्यातरी कोणी करू नये. शासनाने उत्सवावर निर्बंध लावल्यास मंडळांचे, मूर्तिकारांचे कष्ट वाया जातील. संचारबंदी, सोशल डिस्टन्स, सुरक्षितता आदी नियमांचे उत्सवात पालन होणार नाही. त्यामुळे गणेश मंडळ, मूर्तिकारांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. मूर्तिकारांना यंदा कमी उंचीच्या व शाडूच्या गणेशमूर्तींनाच प्राधान्य द्यावे.
राजू गोडसे म्हणाले, वीस ते पंचवीस गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी मूर्तिकारांनीही गणेशोत्सवाबाबत आपल्या काही सूचना मांडल्या.