हळदीच्या हंगामास यंदा सोन्याची झळाळी येणार
By admin | Published: January 4, 2017 11:03 PM2017-01-04T23:03:09+5:302017-01-04T23:03:09+5:30
आवकेत वाढ अपेक्षित : जानेवारीअखेर हंगाम सुरु होणार
शरद जाधव ल्ल सांगली
संपूर्ण देशातच नव्हे, तर परदेशातही हळदीची सर्वात सुरक्षित व दर्जेदार बाजारपेठ म्हणून असलेला सांगलीचा नावलौकिक वाढत चालला आहे. यंदा झालेले चांगले पाऊसमान व समाधानकारक दरामुळे यंदाच्या हळद हंगामात दोन ते अडीच लाख पोत्यांची वाढ अपेक्षित आहे. गेल्यावर्षी साडेआठ लाख पोत्यांची आवक झाली होती.
सध्या शेतकऱ्यांकडून पाला कापणीस सुरुवात झाली असून २२ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत मुहूर्ताने नवीन हंगामास सुरुवात होणार आहे. यंदा १५ जूनपर्यंत हंगाम सुरू राहणार असून मार्चपासून कडप्पा, सेलम, युरोड, सदाशिवपेठ, इकाराबाद, बेहरामपूर येथून हळदीची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा चांगले पाऊसमान झाल्याने हळदीचे उत्पादनही चांगल्या प्रतीचे झाले आहे. पहिल्या टप्प्यात चांगला दर मिळणार असला तरी, शेवटच्या टप्प्यात दरात घसरणीची शंकाही व्यक्त होत आहे.
हळदीची निर्यात वाढणार
गेल्यावर्षी सांगली बाजारपेठेतून जगभरात हळदीची चांगली निर्यात झाली होती. परदेशात हळदीचे आयुर्वेदिक महत्त्व माहीत झाल्याने हळदीचा वापर वाढत चालल्याने यंदाही निर्यात वाढण्याचा आशावाद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही वर्षात हळद निर्यातीत चांगली वाढ होणार आहे.
संपूर्ण देशात सर्वात सुरक्षित हळदीची बाजारपेठ असली तरी, शेजारील राज्यातील काही बाजारपेठेतही आता चांगल्या सुविधा देण्यात येत असल्याने व्यापारास आव्हान निर्माण झाले आहे. यंदा निजामाबाद येथून हळदीची आवक कमी होईल, अशी शक्यता हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तिथे ई-टेंडरिंगेमुळे शेतकऱ्यांनी निजामाबाद बाजारपेठेला प्राधान्य दिले आहे.
नोटाबंदीचा अंशत: परिणाम
वार्षिक ६५० ते ७०० कोटींची उलाढाल असलेल्या सांगलीच्या हळद बाजारपेठेवर नोटाबंदीचा अंशत: परिणाम झाला आहे. बाजारपेठेतील व्यवहार चेकने होत असल्याने चलनाचा तुटवडा जाणवला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी एकूणच वातावरणामुळे हळदीच्या दरात मात्र ५०० ते ७०० रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. अजून नवीन हंगामास सुरुवात झाली नसल्याने दरात घट झाल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. एकंदरीतच नोटाबंदीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेली अस्वस्थेचे वातावरण व शेतकऱ्यातील संभ्रम अवस्थेमुळे आवक घटली आहे.