येडेनिपाणीमध्ये बिबट्यासह बछड्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:31 PM2018-08-02T23:31:49+5:302018-08-02T23:31:53+5:30

Yeddyepani has a view of the peacocks with leopards | येडेनिपाणीमध्ये बिबट्यासह बछड्यांचे दर्शन

येडेनिपाणीमध्ये बिबट्यासह बछड्यांचे दर्शन

Next

गोटखिंडी : बुधवारी रात्री ८.४५ वाजता येडेनिपाणी (ता. वाळवा) येथून मल्लिकार्जुन देवालयाच्या पायथ्याला मजुरांना बिबट्यासह दोन बछड्यांचे दर्शन झाले. त्यामुळे भक्त व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वन विभाग मात्र गप्पच आहे. माणसावर बिबट्याचा हल्ला झाल्यानंतरच वन विभाग जागा होणार काय, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
जून महिन्यापासून गोटखिंडी परिसरात बिबट्याचा वावर दिसत आहे. नंतर काही दिवस बावची, पोखर्णी, मालेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. गत आठवडाभरापासून बावचीपासून पुढे आष्टा परिसरात बिबट्याचे दर्शन होऊ लागले. या परिसरातील बिबट्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर फिरु लागले. बुधवार दि. १ आॅगस्ट रोजी रात्री ८.४५ च्या दरम्यान मल्लिकार्जुन डोंगरावरील देवालय परिसरात पाण्याची टाकी, शौचालय आदीचे बांधकाम सुरु आहे. त्याचे साहित्य हे येडेनिपाणीच्या बाजूच्या पायथ्यास आणलेले आहे. भक्त दररोज साहित्य नेण्यासाठी परिश्रम घेत आहेत. पण सिमेंट, वाळू, खडीची वाहतूक गाढवांच्या माध्यमातून केली जात आहे. तेथे गाढव हाकण्यासाठी मजूर राहत आहेत. या मजुरांना तेथे बिबट्यासह दोन बछड्यांचे दर्शन झाल्यामुळे ते भयभीत झाले होते. याची माहिती येडेनिपाणीत मिळताच बरेच युवक दाखल झाले. पण रात्रीची वेळ असल्याने बिबटे तोपर्यंत पसार झाले होते. मजुरांत व देवालयात येणाऱ्या भक्तांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मल्लकार्जुन देवाची यात्रा भरते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येडेनिपाणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
बिबट्याला चांदोलीकडे हटविणार
आष्टा, गोटखिंडी, येडेनिपाणी परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. याबाबत वनरक्षक येतात, पाहतात अन् जातात. त्याच्या पुढे काहीही केले जात नाही. शिराळा वन क्षेत्राचे वनपाल तानाजी मुळीक व सांगली जिल्हा वन अधिकारी डॉ. भरतसिंग हाडा यांच्याशी संपर्क साधला असता, ‘दोन दिवसात बिबट्याला चांदोली अभयारण्याकडे हुसकण्याचे काम करु, त्याच्यापासून नुकसान काही नसल्याने त्याला पकडण्याचा आम्हास अधिकार नाही,’ असे त्यांनी सांगितले.

Web Title: Yeddyepani has a view of the peacocks with leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.