येरळा, अग्रणी, बोर, माण नद्यांचे पात्र कोरडे; सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील गंभीर चित्र
By शीतल पाटील | Published: August 9, 2023 06:37 PM2023-08-09T18:37:38+5:302023-08-09T18:39:46+5:30
प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही
सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कृष्णा, वारणा या दोन नद्या दुथडी भरून वाहत असताना येरळा, अग्रणी, बोर या दुष्काळी पट्ट्यातील नद्याचे पात्र मात्र कोरडेच असल्याचे गंभीर चित्र आहे. प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. यंदा येरळा, अग्रणी, माण, बोर नदीकाठच्या जनतेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागण्याची शकत्या आहे. त्यातील येरळा व अग्रणी नदीला टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेचा काही प्रमाणात आधार आहे.
जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस व मिरज तालुक्यातील काही भागाला पावसाळ्यात दरवर्षी पुराची भीती सतावत असते. याच काळात येरळा, अग्रणी, माण, बोर या नदींचे पात्र मात्र कोरडेच असते. या नद्या बारमाही कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यापैकी येरळा नदीला ताकारी- टेंभुमुळे, तर अग्रणी नदीला म्हैसाळच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.
येरळा नदी
येरळा नदी कृष्णा नदीची सर्वांत लांब उपनदी आहे. नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ टेकडीवर झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, पलूस, तासगाव या तालुक्यांतून ८५ किलोमीटरचा प्रवास करीत येरळा नदी ब्रह्मनाळजवळ कृष्णा नदीत मिसळते. या नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीमध्ये टेंभू ताकारीचे पाणी सोडले जाते. सध्या नदीत बांधलेल्या बंधाऱ्यांत थोडेफार पाणी दिसून येते. तूरची, ढवळी परिसरात मात्र नदीचे पात्र कोरडेच आहे. वसगडे बंधाऱ्यात थोडेफार पावसाचे पाणी आहे.
अग्रणी नदी
खानापूर तालुक्यातील तामखडी येथे उगम पावणाऱ्या अग्रणी नदीचे खोरे खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात विस्तारले आहे. ही नदी तशी कोरडीच म्हणावी लागेल. टेंभूच्या पाण्यामुळे बेनापुर, सुलतानगादे, करंजे बंधाऱ्यापर्यंत पाणी असते. त्यानंतर गव्हाणपर्यंत नदीचे पात्र कोरडे आहे. गव्हाणमध्ये म्हैशाळ योजनेचा पाचवा टप्पा असून, लिंगनूर बाजूने सिंचन योजनेचे पाणी येते. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात नदीचे पात्र पावसाळ्यातही कोरडे ठणठणीत आहे.
बोर नदी
जत तालुक्यातील दुष्काळाची मूक साक्षीदार असलेली बोर नदी पावसाळ्यातही कोरडीच आहे. यंदा जत तालुक्यात पाऊसमानही कमी झाले आहे. नदीचे पात्र ठणठणीत आहे. परतीच्या पावसात या नदीला थोडेफार पाणी असते. तेही आठ - दहा दिवसांतच निघून जाते. यंदाही परतीच्या पावसाकडे बोर नदी खोऱ्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.
माण नदी
जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यातून वाहणारी माण नदी नेहमीच कोरडी असते. ‘बारमाही कोरडी नदी’ म्हणून तिचा उल्लेख होतो. यंदाच्या पावसाळ्यातही नदीला पाणी नाही. नदीजोड प्रकल्पातूनच माण नदी प्रवाहित होऊ शकते.