काल जेवलो, आज जेवायचे नाही का?
By admin | Published: February 17, 2017 11:52 PM2017-02-17T23:52:38+5:302017-02-17T23:52:38+5:30
महामार्गावरील वाहनधारकांना सवाल : कऱ्हाड पोलिसांकडून वसुली जोमात
अशोक पाटील --इस्लामपूर -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा ते कऱ्हाडपर्यंत महामार्ग पोलिसांनी पैसे वसुलीसाठी उच्छाद मांडला आहे. त्रुटी काढून वाहनांवर खटला दाखल करायचा आणि पैसे उकळून सोडून द्यायचे, असा प्रकार सुरू आहे. इस्लामपुरातील एका मालवाहतूक करणाऱ्याला कऱ्हाडच्या महामार्ग पोलिसांनी सलग दोन दिवस पकडले. दुसऱ्यादिवशी त्याने, ‘अहो कालच पैसे दिले, आज परत काय?’ असे म्हटल्यावर त्यातील एका पोलिसाने, ‘काल जेवल्यावर आज जेवत नाही का?’ असा सवाल करून पुन्हा पैसे घेतलेच!
मार्च महिनाअखेर वसुली व खटल्यांचे ‘टार्गेट’, त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पोलिसांना वाहने तपासण्याचे आदेश आहेत. हे आयते कोलितच मळाल्याने, त्यांच्याकडून लुटण्याचा उद्योग सुरू असल्याचे वाहनधारक सांगतात. कायद्याचे पालन करणाऱ्यांनाही याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
सध्या महामार्गावरील वाळवा व कऱ्हाड तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या मालखेड, बेलवडे, वाळवा तालुक्यातील वाघवाडी फाट्यावर कऱ्हाड येथील महामार्ग पोलिस वाहन तपासणीच्या निमित्ताने थांबलेले दिसतात. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या कणेगाव येथेही कुरळप पोलिस ठाण्याचे पोलिस दिसतात. ते दररोज वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचे, वाहनधारकांनी सांगितले. एखाद्याने कायद्याची भाषा सुरू केली की, त्याला दंडाची पावती दिली जाते.
चार दिवसांपूर्वी असाच प्रकार इस्लामपूर येथील वाहनधारकाशी घडला. वाघवाडी येथे वाहनांची तपासणीसाठी उभ्या असलेल्या कऱ्हाड येथील पोलिसांनी त्याच्याकडून पैसे उकळले होते. पुन्हा दुसऱ्यादिवशी त्याच वाहनाला अडवून याच पोलिसांनी पैशाची मागणी केली. त्यावर या वाहनधारकाने, ‘अहो साहेब, कालच पैसे दिले, आज परत कशाला पैसे मागता?’ असा प्रश्न विचारला. त्यावर एका पोलिसाने, ‘काल जेवल्यावर आज भूक लागत नाही का?’ असा प्रतिसवाल करून पैसे घेतलेच. वाहनधारकांकडे सर्व कागदपत्रे असतानाही, त्रुटी काढून पैशाची मागणी होती. याला वाहनधारक कंटाळले असून, सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांनी कऱ्हाडच्या पोलिसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
एक आणि दोन नंबर बॅच
कऱ्हाड महामार्ग पोलिस विभागात एकूण ३४ पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. येथे १७-१७ पोलिसांच्या दोन बॅच कार्यरत आहेत. एक बॅच २४ तास सेवा करते. त्यानंतर दुसरी बॅच २४ तास महामार्गावर सेवा देते. परंतु यातील पहिली बॅच पैसे उकळण्यात आणि वाहनधारकांना त्रास देण्यात तरबेज आहे.