कालचे शत्रू झाले आजचे कट्टर मित्र!

By admin | Published: September 17, 2016 11:34 PM2016-09-17T23:34:54+5:302016-09-17T23:59:14+5:30

महापालिकेतील स्थिती : एकमेकांवरील कुरघोड्यांमुळे शहराच्या विकासाचा बाजार

Yesterday was an enemy of today's fanatic friends! | कालचे शत्रू झाले आजचे कट्टर मित्र!

कालचे शत्रू झाले आजचे कट्टर मित्र!

Next

शीतल पाटील -- सांगली --महापालिकेचे राजकारण सध्या इतके गुंतागुंतीचे झाले आहे की, कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हेही ओळखणे अशक्य आहे. कधीकाळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे आता विरोधक म्हणवून घेत आहेत, तर एकमेकांना पाण्यात पाहणारे सत्तेचे लाभार्थी झाले आहेत. पालिकेच्या या बिग बझार राजकारणामुळे विकासाचा बाजार झाला आहे. त्यातून सत्ताधारी, विरोधक आणि नगरसेवकांची प्रशासनावरील पकड ढिली होत आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य सांगलीकरांना भोगावे लागत आहेत.
महापालिकेच्या स्थापनेपासूनच राजकारणाचे वारे सातत्याने बदलले आहे. पण गेल्या दहा वर्षात त्यात वेगाने बदल झाले. मदन पाटील यांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून विरोधकांची मोट बांधली. राजारामबापू पाटील यांचे शिष्य असलेले संभाजी पवार, शरद पाटील ही मंडळीही एकत्र आली. डाव्या, उजव्या विचारांना एकत्र करून जयंतरावांनी पालिकेची सत्ता हस्तगत केली खरी, पण अल्पावधीतच पालिकेतील महत्त्वाकांक्षी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सत्तेलाही सुरूंग लावला. पाच वर्षानंतर पुन्हा मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आली. पण त्यांच्या निधनानंतर मात्र आता अनेकांना पालिकेचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. त्यातून काँग्रेसमध्ये महापौर विरूद्ध उपमहापौर असे गट निर्माण झाले. खऱ्याअर्थाने हे दोन्ही गट नावालाच आहेत. यामागे वसंतदादा घराण्यातील छुपा राजकीय संघर्षच नव्याने समोर येत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. मदनभाऊ समर्थक विरूद्ध विशाल पाटील समर्थक अशी नवी लढाई पालिकेच्या राजकारणात सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये शकले झाली असतानाच, इतर पक्षांची अवस्थाही तशीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर १७ जण निवडून आले. त्यांना सहा अपक्षांनी पाठिंबा दिला. आता चिन्हावर निवडून आलेल्यांपैकी काहीजण दुसऱ्या गटाच्या वळचणीला गेले आहेत, तर पाठिंबा देणाऱ्या अपक्षांपैकी चारजणांनी भाजपला जवळ केले आहे. स्वाभिमानी आघाडीचे ९ सदस्य निवडून आले. त्यातील तीन नगरसेवकांनी भाजप म्हणून स्वतंत्र काम सुरू केले आहे. उर्वरित सहा जणांमध्ये संभाजी पवार समर्थक तीन, तर रिपाइं, मनसे व जनता दलाचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. पवार समर्थकांचे नेतृत्व गौतम पवार यांच्याकडे आहे. उर्वरित तीन नगरसेवक सोयीची भूमिका घेतात.
वसंतदादा घराणे व संभाजी पवार यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. पण गेल्या वर्षभरात विशाल पाटील व संभाजी पवार समर्थकांची पालिकेत गट्टी जमली आहे. तशी ही युती म्हणे छुपी होती, आता ती उघड झाली आहे.
महापालिकेच्या राजकारणात सध्या नीतिमत्तेची चाड कुणालाच राहिलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. पक्षाचा व्हीप, आदेश मोडूनही नगरसेवक काम करू लागल्याने धाक राहिलेला नाही. पक्षाच्या व्यासपीठाचा उपयोग करून नगरसेवकपद उपभोगता येते, पक्षात राहून सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची खेळी खेळता येते व आपली स्वत:ची पोळी भाजून घेता येते. याशिवाय गेले काही महिने जे सत्तांतर चालले आहे, ते तर भयानक आहे. कोणताच राजकीय पक्ष तत्त्वनिष्ठ राहिलेला नाही. राजकीय पक्षांत सुरू असलेली चढाओढ पाहता, लोकांना त्याची किळस येत आहे.


राष्ट्रवादीची : मदनभाऊ गटाला छुपी रसद
विशाल पाटील व संभाजी पवार यांच्यातील नव्या युतीमुळे काँग्रेसमधील मदन पाटील गट एकाकी पडला होता. पण या गटाच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून येत आहे. जिल्हा बँक व मार्केट कमिटीच्या निवडणुकांत राजकीय प्रतिस्पर्धी असलेले जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले होते. मदनभाऊंच्या पश्चात राष्ट्रवादीने या गटाला कधी उघड, तर कधी छुपी रसद पुरविली आहे. त्यामुळेच पालिकेतील मदनभाऊ गटाची वाटचाल आजअखेर सुकर झाली आहे.


अधिकाऱ्यांचे विकास कामांकडे दुर्लक्ष
राजकीय पक्षांतील कुरघोड्यांमुळे प्रशासनाचे मात्र फावले आहे. एकमेकांवर ढकलून, कामच न करण्याची प्रवृत्ती अधिकाऱ्यांत वाढत आहे. एखादा विषय मंजूर झाला तरी, कोणी विरोध केला म्हणून त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे. यातून सर्वसामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज योजनेची वाट लागली आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. स्वच्छता, कचरा उठाव दिसत नाही. गटारी तुंबल्या आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. अशा कित्येक समस्या पालिकेसमोर आव्हान बनून आहेत. पण राजकीय संघर्षामुळे प्रशासनाला जाब विचारण्याची सत्ताधारी, विरोधकांची हिम्मतच संपली आहे. प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने नागरी समस्या जैसे थेच आहेत.

Web Title: Yesterday was an enemy of today's fanatic friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.