योगदिनी जिल्ह्यात सर्वत्र ‘वर्षासन’
By admin | Published: June 21, 2015 11:15 PM2015-06-21T23:15:28+5:302015-06-22T00:19:46+5:30
शिराळ्यात मुसळधार : तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, विटा येथे दिवसभर मुक्काम
सांगली : सांगली, मिरजेसह तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी याठिकाणी रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जागतिक योगदिनी जिल्ह्याच्या दुष्काळी भागासह सर्वत्र ‘वर्षासन’ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. जत तालुक्यात शिडकावा झाल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, एरंडोली, मल्लेवाडी, शिपूर व बेळंकी परिसरात रविवारी सकाळपासून मान्सून पावसाने हजेरी लावली. परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. पेरणी केलेल्या मका, मूग या पिकांना मान्सूनची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. मागील आठवड्यात मान्सून फिरकला नसल्याने खरीप पिकांची पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोनी (ता. मिरज) परिसरामध्ये पावसाची दमदार सुरुवात झाली असून पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला आता सुरुवात होणार आहे. काही शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे, त्या पिकांनाही जीवदान मिळणार आहे. सोनीसह परिसरातील धुळगाव, पाटगाव, भोसे, करोली (एम) परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पेरणी खोळंबली होती. गेल्या दोन वर्षापासून अपुऱ्या पावसामुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नव्हते. पण यावर्षी पावसाने उशिरा का होईना, पण जोरदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
वाळवा तालुक्यात मुक्काम
इस्लामपूर : शहरासह संपूर्ण वाळवा तालुक्यात मान्सूनच्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावली असून रविवारी दिवसभर संततधार सुरूच होती. त्यामुळे शेतकऱ्यांनीही सकाळपासून सोयाबीन, भुईमुगाची टोकणी, पेरणी करायला सुरुवात केली. रविवारी दिवसभर कधी मोठ्या, तर कधी मध्यम स्वरुपाच्या पावसाने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शहरात नव्याने झालेल्या रस्ते डांबरीकरणाच्या कामात पाण्याचा निचरा होण्याच्या शास्त्रीय पध्दतीचा वापर केला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहिले होते. आठवडा बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत इस्लामपुरात ७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बहे मंडलात सर्वाधिक ३८, तर कुरळप मंडलात केवळ २ मि.मी. पाऊस झाला. पेठ व रेठरेधरण परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. आष्टा (ता. वाळवा) परिसरात रविवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
विट्यासह परिसरात हजेरी
विटा शहरासह तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस पडत होता. हा पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता. दिवसभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विटा शहरासह तालुक्यातील पारे, बामणी, चिंचणी, आळसंद, भाळवणी, ढवळेश्वर, खानापूर, गार्डी, घानवड, नागेवाडी, चिखलहोळ, देविखिंडी, लेंगरे, भूड, साळशिंगे परिसरात कमी-जास्त प्रमाणात दिवसभर पाऊस पडत होता. या पावसाने शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले होते.