सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय
By संतोष भिसे | Published: September 16, 2022 02:05 PM2022-09-16T14:05:51+5:302022-09-16T14:06:34+5:30
जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे.
सांगली : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या योगेश पवार या विद्यार्थ्याने वायरमन शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ६०० पैकी ५७४ गुण मिळविले. मशिनिस्ट ग्रायंडर शिक्षणक्रमाचा विद्यार्थी विजय मराठे याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा शनिवारी सकाळी ११ वाजता संस्थेत होणार आहे. यावेळी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचा सत्कार आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते केला जाईल. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याना गौरविण्यात येईल. प्रत्येक शिक्षणक्रमात पहिले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल.
विद्यार्थ्याचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे, त्यानुसार सांगलीतही कार्यक्रम होत आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य यतिन पारगांवकर यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाला प्रथितयश उद्योजक उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय रक्तदान शिबीरही आयोजित केले आहे. संयोजन उपप्राचार्य व्ही. बी. देशपांडे, सदाशिवराव पाटील, गटनिदेशक शिवाजी गोसावी आदींनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे.