पालकमंत्र्यांकडून थेट ऑफर, खासदार विशाल पाटील म्हणाले..
By हणमंत पाटील | Published: July 9, 2024 12:22 PM2024-07-09T12:22:59+5:302024-07-09T12:25:20+5:30
रेल्वेच्या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी : हुबळी एक्स्प्रेसला १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाला किर्लोस्करवाडीत थांबा
रामानंदनगर : खासदार विशाल पाटील तुम्ही म्हणता की, सर्वांनी मला निवडून दिले आहे. तर मग आमच्यासोबत यायचे सोडून चुकीच्या ठिकाणी का गेला? अजूनदेखील तुमचे आमच्या सरकारमध्ये स्वागत आहे. एकत्र येऊन कामे मार्गी लावू, अशी थेट ऑफर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रेल्वेच्या जाहीर कार्यक्रमात पाटील यांना दिली. यावर ‘मी माझी विचारधारा सोडणार नसून तुम्ही मला प्रलंबित कामे सोडविण्यासाठी सहकार्य करा,’ अशी टिप्पणी विशाल पाटील यांनी केली.
गेल्या पंधरा वर्षांपासून मध्य रेल्वे प्रवासी संघटनेची हुबळी एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याची मागणी होती. या मागणीची अखेर रविवारी पूर्तता झाली. हुबळी एक्स्प्रेस गाडी क्रमांक १७३१७ /१८ ही किर्लोस्करवाडी येथे थांबली. यावेळी पालकमंत्री खाडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या वेळी खासदार विशाल पाटील आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
किर्लोस्करवाडी येथील रेल्वेथांब्याची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली. त्यामुळे हुबळी एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांना पूर्वी मिरज किंवा कराड येथे उतरावे लागत असे, तो त्रास आता वाचणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पालकमंत्री खाडे यांच्यासह आमदार विश्वजीत कदम व अरुण लाड यांचे आभार मानतो, असे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले. रेल्वे कृती समितीचे जयसिंग नावडकर, अख्तर पिरजादे, प्रसाद कुलकर्णी, राजाराम गरुड, संदीप पाटील, अमित पाटील, डॉ. चंद्रशेखर माने, रामचंद्र दीक्षित, राजाभाऊ माने, जीवन नार्वेकर, विजय पिसे, संदीप धाइंजे आदी उपस्थित होते.
प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक
किर्लोस्करवाडीला रेल्वेचा थांबा मिळाल्याने परिसरातील प्रवाशांची मुंबईला जाण्याची चांगली सोय झाली. कोल्हापूरहून केवळ मिरजपर्यंत येणारी पॅसेंजर गाडी देखील आपण किर्लोस्करवाडीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खाडे यांनी दिले. लवकरच मिरज येथे रेल्वेचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रवासी संघटना व शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, असे विशाल पाटील यांनी सांगितले.