महागडे पेट्रोल मिळेल, फुकटची हवा मात्र मागू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:35+5:302021-06-09T04:32:35+5:30
सांगली : पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेलसह हवा, पाणी आणि स्वच्छतागृहे विनाशुल्क उपलब्ध असल्याचा डिंडोरा तेल कंपन्या पिटतात, प्रत्यक्ष वस्तुस्थिती ...
सांगली : पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेलसह हवा, पाणी आणि स्वच्छतागृहे विनाशुल्क उपलब्ध असल्याचा डिंडोरा तेल कंपन्या पिटतात, प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पंपांवरील हवेची यंत्रे भंगार झाली आहेत.
लॉकडाऊनमध्ये गॅरेज बंद झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने लक्षात आली. अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू राहिली, पण वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी गॅरेज मात्र सुरू नाहीत. या काळात वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर हवा भरण्याचा प्रयत्न केला असता, सर्रास पंपांवर हवा भरणारी यंत्रे बंद असल्याचे दिसून आले आहे. काही यंत्रे बिघडली आहेत, तर काही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनधारकांची ससेहोलपट होत आहे. ग्राहकांना अत्यावश्यक सेवा देण्याची तेल कंपन्यांची भाषा फक्त कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. पंपांवरील स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करण्याचा आदेशही कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी काढला होता, तोदेखील फोल ठरला आहे. पंपांवरील सर्रास स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहेत.
पेट्रोल व डिझेलच्या किमतीची उड्डाणे शंभरीपार होत असताना ग्राहकांना किमान माफक सुविधाही देण्याकडे तेल कंपन्या व पंपचालकांचे दुुर्लक्ष होत आहे.
कोट
दुचाकीमध्ये हवा भरण्यासाठी १५-२० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. सांगली-मिरजेसह ग्रामिण भागातही पंपांवर हवा भरण्याची यंत्रणा बंद अवस्थेत आहे. लॉकडाऊनमध्ये पंक्चरची दुकाने बंद असल्याच्या काळात पंपचालकांकडून हवा पुरवले जाणे गरजेचे होते. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी.
- रवीकांत साळुंखे, उपाध्यक्ष, भाजप (ग्रामीण)