VidhanSabha Election 2024: तासगाव-कवठेमहांकाळला यंग ब्रिगेड मैदानात; दुरंगी की तिरंगीवर ठरणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 06:24 PM2024-10-19T18:24:09+5:302024-10-19T18:24:48+5:30
अजितराव घोरपडे यांची भूमिका निर्णायक
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळविधानसभा मतदारसंघात यंदा यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. मात्र, ही लढत दुरंगी की तिरंगी होणार, यावर निवडणुकीतील विजयाचा फैसला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून रोहित पाटील रिंगणात निश्चित झाले आहेत. भाजपचे प्रभाकर पाटील रिंगणात निश्चित असले, तरी महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्मुल्यात त्यांची उमेदवारीचे थांबली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात मोठी उलथापालथ झाली. होमग्राऊंड असूनही या मतदारसंघात भाजपचे माजी खासदार संजय पाटील पिछाडीवर पडले. तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पहिल्यांदाच संजय पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शरद पवार गटाकडून आमदार सुमनताई पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सोशल मीडियावर पक्ष आणि चिन्ह दिसत नाही. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात जातील, अशी चर्चा आहे. परंतु, कोणत्या पक्षातून रिंगणात उतरणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील यांची लढत निश्चित मानली जात आहे.
दोन्ही उमेदवार तासगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नेतृत्व अजितराव घोरपडे यांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. अद्याप घोरपडे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलेले नाही. तरी पडद्याआड घोरपडे गटाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन ऐनवेळी रिंगणात उतरणार का ? त्यांच्या भूमिकेची उत्सुकता आहे. त्यावरच निवडणुकीतील विजयाची गणिते ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
तिसऱ्या पर्यायाची तयारी..
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेची माजी संचालक प्रताप पाटील, तर ‘वंचित’कडून वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे यांनी मोर्चेबांधणी सुरू आहे. ‘मनसे’कडून अमोल काळे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तासगाव कवठेमहांकाळच्या राजकीय घडामोडीविषयी मतदारांना उत्सुकता आहे.
२०१९ निवडणूक
- सुमनताई पाटील - १,२८,३७१
- अजितराव घोरपडे - ६५,८३९
सध्याचे मतदान
- एकूण मतदार - ३,११,३४०
- पुरुष मतदार - १,५८,५३७
- स्त्री मतदार - १,५२,७९९
- तृतीयपंथी - ४