इटकरेत कोरोनाच्या भीतीने तरुण अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:15+5:302021-07-16T04:19:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इटकरे (ता. वाळवा) येथील २८ वर्षीय स्थापत्य अभियंत्याने कोरोना संसर्गाच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इटकरे (ता. वाळवा) येथील २८ वर्षीय स्थापत्य अभियंत्याने कोरोना संसर्गाच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. बुधवारी त्याचा वाढदिवस होता. त्याच दिवशी ही घटना घडल्याने कुटुंब शोकसागरात बुडाले होते. निखिल लक्ष्मण भानुसे असे त्याचे नाव आहे.
निखिल बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. चार दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली औषधे तो घेत होता. बुधवारी रात्री वडिलांनी निखिलला त्याच्या खोलीमध्ये जेवण दिले. त्यानंतर सर्व कुटुंब झोपी गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास निखिल उठला होता. त्याने वडिलांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून दूध मागितले. त्यावर वडिलांनी त्याला दूध दिले. वडील पहाटे साडेपाचच्या सुमारास उठले होते. त्यावेळी घराच्या बाजूच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत निखिल दिसला. भानुसे कुटुंबाने दु:खावेगाने फोडलेला हंबरडा पहाटेच्या शांततेत थरकाप उडविणारा ठरला. या घटनेची नोंद कुरळप पोलिसात झाली आहे.
चौकट
तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
स्थापत्य अभियंता असलेला निखिल स्वभावाने अत्यंत हळवा, विचारी आणि मीतभाषी होता. कामेरी, येडेनिपाणी, तुजारपूर या परिसरात त्याची बांधकामाची कामे सुरू होती. एप्रिलमध्येच त्याचे लग्न झाले होते. कोरोनाची लागण झाल्यापासून गेल्या चार दिवसात तो नैराश्य आणि चिंतेच्या सावटाखाली वावरत होता. त्याच भीतीने त्याने जीवनयात्रा संपविली. लग्नानंतरची स्वप्ने फुलण्यापूर्वीच त्याने आयुष्याचा डाव अर्ध्यावर उधळून टाकल्याने कुटुंब हतबल झाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, चुलते असा परिवार आहे.