मिरजेत वीज पडून तरुण शेतकर्याचा जागीच मृत्यू
By admin | Published: May 19, 2014 12:19 AM2014-05-19T00:19:52+5:302014-05-19T00:20:11+5:30
मिरज : मिरजेत वादळी पावसाने वीज पडून अरुण मारुती लोकरे (वय ३५, रा. पंढरपूर रस्ता) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. आज, रविवारी दुपारी ही घटना घडली.
मिरज : मिरजेत वादळी पावसाने वीज पडून अरुण मारुती लोकरे (वय ३५, रा. पंढरपूर रस्ता) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. आज, रविवारी दुपारी ही घटना घडली. मिरज शहर व परिसरास दुपारी वादळी वार्यासह जोरदार पावसाने झोडपल्याने नागरिकांची दैना उडाली. जनजीवन विस्कळीत झाले. शहरात दुपारी चार वाजता वादळी वार्यासह पाऊस झाला. पंढरपूर रस्त्यावर लोकरे मळा येथे शेतातील चिंचेच्या झाडावर वीज पडल्याने झाडाखाली थांबलेल्या लोकरे या तरुण शेतकर्याचा भाजून मृत्यू झाला. शेतात काम करताना पाऊस आल्याने हा शेतकरी झाडाखाली थांबला होता. अचानक वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोकरे यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले, आई, वडील असा परिवार आहे. लोकरे यांच्या मृत्युमुळे कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडून विद्युत पुरवठा खंडित झाला. गुठेवारी वसाहतीत पावसाने दलदल निर्माण झाली होती. सुमारे अर्धा तास पावसाने झोडपले. अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची दैना उडाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात पाणी साचले. शहरात विविध ठिकाणी खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला. (प्रतिनिधी)