पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार; पीडितेची कर्नाटकात विक्री करून लग्न लावून दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 05:45 PM2024-02-23T17:45:36+5:302024-02-23T17:46:26+5:30
तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
मिरज : पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कारप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.
पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विवाहित तरुणी नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला जाताना तिला रेल्वेत झोप लागल्याने ती मिरजेत पोहोचली. मिरज रेल्वेस्थानकाबाहेर मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी सिंग व त्याच्या चार साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला कर्नाटकात जमखंडी येथे नेऊन चार लाख रुपयांना विक्री करून तिचे लग्न लावून दिले.
सामूहिक अत्याचाराची तिने माहिती दिल्यानंतर तिच्यासोबत लग्न केलेल्या संबंधिताने पीडितेला पुन्हा मिरजेत आणून सोडून लग्नासाठी दिलेले चार लाख रुपये परत घेतले. पीडितेने याबाबत पुण्यात जाऊन फिर्याद दिल्यानंतर ती मिरज पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.
मिरजेत गांधी चौक पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह ११ जणांना अटक केली असून, ते सर्व जण तुरुंगात आहेत. पोलिस तपासात पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत.