मोटार झाडावर आदळून विट्याचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:13 AM2018-09-19T00:13:02+5:302018-09-19T00:13:06+5:30
विटा : गोवा येथून विट्याकडे येणाऱ्या अल्टो मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जयेंद्र रवींद्र लिमये (वय २८, रा. विवेकानंदनगर, विटा) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत.
चालक विद्याधर प्रताप कुलकर्णी (३०), विश्वास रत्नाकर जोग (४४, दोघेही रा. विटा), महेश मुकुंद इनामदार (२७, रा. रेणावी, ता. खानापूर) व तेजस दत्तात्रय कुलकर्णी (३०, रा. सांगली) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता निपाणी येथे झाला.
येथील जयेंद्र लिमये, विद्याधर कुलकर्णी, विश्वास जोग, महेश इनामदार व तेजस कुलकर्णी गणेशोत्सवातील पूजा-अर्चा करण्यासाठी अल्टो मोटारीने गणेश चतुर्थीच्या पहिल्यादिवशी बुधवार, दि. १२ रोजी गोवा येथे गेले होते. सोमवारी पाचव्यादिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर रात्री हे पाचजण गोव्याहून विट्याकडे येण्यासाठी निघाले होते.
बुधवारी पहाटे निपाणी शहराजवळ त्यांची मोटार आली असता, चालक विद्याधर कुलकर्णी यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने भरधाव मोटार राष्टÑीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, जयेंद्र लिमये जागीच ठार झाला; तर मोटारीतील अन्य चौघेजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
मृत जयेंद्र लिमये येथील डॉ. रवींद्र लिमये यांचा एकुलता एक मुलगा होता. अपघाताचे वृत्त समजताच विट्यातून नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले. बुधवारी सायंकाळी सर्व जखमींना विटा येथे आणण्यात आले; तर रात्री उशिरा मृत जयेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.