Sangli News: प्रियेसीला घेवून दुचाकीवरुन निघाला, अंधारात वाटेतच विहिरीत कोसळला; युवतीचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 01:43 PM2023-02-01T13:43:47+5:302023-02-01T14:14:09+5:30
युवक बचावला, संबंधित युवकांच्या विरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमी युवक आणि युवती हे मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलसह विहिरीत पडल्याची घटना घडली. याअपघातात युवतीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला, तर युवक बचावला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.
तासगाव पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, या घटनेतील अल्पवयीन युवक हा तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावचा आहे. त्याची मावशी तालुक्यातील दुसऱ्या एका गावात राहते. काही कारणाने त्याचे मावशीकडे जाणे येणे होते. मावशीच्या जवळपास संबंधित युवती राहत होती. यातुन त्याचे एकमेकांसोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा होती. यातून त्याच्यात भेटी गाठी सुरू झाल्या.
सोमवारी मध्यरात्री या प्रेमी युगलाची भेट झाली. यानंतर ते गावाबाहेर गेले. काही वेळानंतर युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघेजण मोटार सायकलवरून घरी परतत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्या शेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण मोटारसायकल सह कोसळले.
युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व अंधाऱ्या रात्री तो विहिरी बाहेर आला. पण त्या युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकाने तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करत आहेत.