एटीएम फोडणाऱ्या तरुणाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:57 PM2019-10-07T14:57:35+5:302019-10-07T14:58:25+5:30
शंभरफुटी रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहात पकडले. ओंकार रामचंद्र कदी (वय २२, रा. हरभट रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.
सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहात पकडले. ओंकार रामचंद्र कदी (वय २२, रा. हरभट रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक शनिवारी रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी ठाणे अंमलदार विलास मुंढे यांना शंभरफुटी रस्त्यावरील आनंदश्री अपार्टमेंटमधील बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक फौजदार कोष्टी, विलास मुंढे, सुदर्शन पाटील, सचिन फडतरे, बबलू तांबट, ऋतुराज होळकर हे तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले.
यावेळी एटीएममध्ये ओंकार कदी हा तोंडाला रुमाल बांधून काही तरी करीत असताना आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे कटावणी व स्क्रू ड्रायव्हर मिळून आला. त्याने एटीएमचा लहान दरवाजा उघडला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता, दुचाकीवरून पैसे चोरण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली.
त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेची माहिती बँक आॅफ महाराष्ट्रचे अधिकारी व सुरक्षा एजन्सीना देण्यात आली आहे.