मिरज शहर पोलीस स्टेशन मध्ये पेटवून घेतलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 11:08 AM2021-11-27T11:08:53+5:302021-11-27T11:10:29+5:30
सर्फराज या व्यसनी तरुणाने बुधवारी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. यात तो सुमारे ५० टक्के भाजला होता.
मिरज : मिरज शहर पोलीस स्टेशन मध्ये स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर आज, मृत्यू झाला. सर्फराज महमदली जमखंडीकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) असे या मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि.२४) मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच त्याने पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले होते.
याबाबत माहिती अशी की, सर्फराज या व्यसनी तरुणाने बुधवारी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. यात तो सुमारे ५० टक्के भाजला होता. त्याला सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाणीची तक्रार घेत नसल्याच्या कारणावरून त्याने हे कृत्य केल्याने शहरात खळबळ उडाली होती.
सर्फराज जमखंडीकर नशेत शहर पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी पत्नीसोबत गेला होता. यासीन, अबुबकर व आयुब या तिघांनी मला मारहाण केली असून, त्यांना लगेच अटक करा, असे म्हणत त्याने गोंधळ घातला. तो नशेत असल्याने पोलिसांनी त्याच्या तक्रारीबाबत पडताळणी करून दाखल करून घेतो, असे सांगितले. मात्र नशेत असलेल्या सर्फराज यास त्याचा राग आल्याने त्याने तिघांना आताच अटक करा, नाहीतर मी त्यांच्या गाड्या पेटवतो, असे म्हणत त्याने पत्नीच्या हातातून पेट्रोलची बाटली घेऊन अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले होते.