कसबे डिग्रजला गव्याच्या हल्ल्यात तरुण बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:14 PM2021-12-25T13:14:45+5:302021-12-25T13:16:48+5:30
गव्याने तरुणावर अचानक हल्ला करत दहशत निर्माण केली. संंबंधीत तरुण गटारीसाठी खोदलल्या चाचीत पडल्याने बचावला.
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान डिग्रज-ब्रह्मनाळ नदीवाट येथे गव्याने तरुणावर अचानक हल्ला करत दहशत निर्माण केली. संंबंधीत तरुण गटारीसाठी खोदलल्या चाचीत पडल्याने बचावला. हल्ल्यानंतर गवा परिसरातील शेतामध्ये निघून गेला. यामुळे सध्या भीतीचे वातावरण आहे.
कसबे डिग्रज ते ब्रह्मनाळ रस्ता येथे काही दिवसांपूर्वी गवा रेड्याने दर्शन झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सचिन मोरे हा काही नागरिकांस या ठिकाणी काम करत होता. यावेळी अचानक गवा त्या ठिकाणी आला व नागरिकांवर चाल करून गेला. यामुळे भयभीत झालेले नागरिकांनी पळ काढला. सचिन मोरे याच्यापासून काही अंतरावर गवा आला असता सचिन गटारीच्या चाचीमध्ये कोसळला; यामुळे तो गव्याच्या हल्ल्यातून बचावला.
मात्र चाचीत पडल्याने सचिनला दुखापत झाली. यानंतर गवा ब्रह्मनाळ रस्ता परिसरातील शेतात निघून गेला. ब्रह्मनाळ रस्ता परिसरामध्ये शेतात अनेक वस्त्या आहेत. गवा दुसऱ्यांदा या परिसरात दिसल्याने ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे या गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वन विभागाच्या उदासीनतेमुळे संताप
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आनंदराव नलवडे यांनी ही माहिती वनविभागाला दिली आहे. वन विभागाचे पथक रात्री उशिरा येणार होते. गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा कसबे डिग्रज परिसरात सातत्याने त्रास होत असतानाही वन विभागाने उदासीन भूमिका घेत असल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.