कृष्णा नदीत तरुण बुडाला; दोघांना वाचविले

By admin | Published: July 22, 2015 12:43 AM2015-07-22T00:43:39+5:302015-07-22T00:45:32+5:30

मंगळवारी दुपारी घडली घटना

Young star flows in Krishna river; Saved both | कृष्णा नदीत तरुण बुडाला; दोघांना वाचविले

कृष्णा नदीत तरुण बुडाला; दोघांना वाचविले

Next

सांगली : येथील कृष्णा नदीत पोहायला गेलेले तीन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. यातील दोन तरुणांना वाचविण्यात मच्छिमारांना यश आले. बुडालेल्या एका तरुणाचा शोध सुरू आहे, पण तो सापडला नाही. शरद तुकाराम पवार (वय १७, रा. हनुमाननगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. सायंकाळनंतर शोध थांबविण्यात आला.
शरद पवार व त्याचे दोन मित्र (नावे समजू शकली नाहीत) येथील गणपतराव आरवाडे महाविद्यालयात बारावीत शिकतात. दुपारी दोन वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर ते कृष्णा नदीत पोहायला गेले होते. स्वामी समर्थ घाटावरून तिघेही नदीत उतरले. त्यांना पोहता येत नव्हते. तरीही ते पाण्याचा अंदाज घेत पाण्यात पुढे जात होते. मध्यभागी गेल्यानंतर तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. शरद पवार याने ‘वाचवा, वाचवा’ म्हणून आरडाओरड केली. हा प्रकार पाहून मच्छिमार इरफान सय्यद यांनी पाण्यात उडी घेतली. सय्यद यांनी शरदच्या दोन मित्रांना सुखरूप बाहेर काढले. शरदला बाहेर काढताना त्याने भीतीने त्यांना मिठी मारली. त्यात त्यांचा गळा दाबला गेला. त्यामुळे दोघेही बुडू लागले. हा प्रकार लक्षात येताच सय्यद बाहेर आले. तोपर्यंत शरद बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दाखल झाले. महापालिकेचा अग्निशमन दल व जीवरक्षक टीम यांनी बोटीतून शरदचा शोध सुरू ठेवला. घाटापासून आयर्विन पुलापर्यंत नदीच्या मध्यभागी शरदचा शोध सुरू होता. मात्र तो सापडला नाही. सायंकाळनंतर शोध थांबविण्यात आला. बुधवारी सकाळी सातपासून पुन्हा शोध घेतला जाणार आहे.
शरदचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्या बहिणीचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. शरद नदीत बुडाल्याचे समजताच त्याचे कुटुंबीय स्वामी समर्थ घाटावर बसून होते. (प्रतिनिधी)
मित्रांचे पलायन
शरद बुडाल्याचे लक्षात येताच त्याच्या दोन मित्रांनी भीतीने पलायन केले. ते विश्रामबाग येथील वारणालीत राहतात, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस त्यांचा शोध घेणार आहेत. दरम्यान, शरदची शाळेची बॅग व चपला घाटावर मिळाल्या. या दोन्ही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Web Title: Young star flows in Krishna river; Saved both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.