सांगलीत चाकू हल्ल्यात तरुण ठार
By admin | Published: November 3, 2016 12:05 AM2016-11-03T00:05:06+5:302016-11-03T00:05:06+5:30
चौघेजण जखमी : भांडण सोडविण्यास गेला अन् जिवाला मुकला
सांगली : येथील न्यू टिंबर एरियातील भीमनगर परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचाच चाकूने वार करून खून करण्यात आला. आदर्श ऊर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या वादावादीत अन्य चौघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत नरसूचा भाऊ विकी वाघमारे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात संतोष दादासाहेब ठोकळे, त्याचे साथीदार नितीन बापू ठोकळे व सोनू ऊर्फ योगेश रवी पाटील (सर्व रा. भीमनगर) या तिघांवर खुनाचा संशय आहे. यातील संशयित संतोष ठोकळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष व त्याचे दोन साथीदार नितीन व सोनूसह भीमनगरमधील भीमकट्ट्यावर बसले होते. यावेळी संतोष दारूच्या नशेत होता. याच परिसरात राहणाऱ्या अक्काताई सनदी (वय ८०) रस्त्याने घरी निघाल्या होत्या. त्यांना पाहून संतोषने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कानाखाली थप्पड मारली. यातून त्यांच्यात वाद झाला. अक्काताईचा नातलग सूरज सनदी यानेही संतोषशी वाद घातला.
संतोष व सनदी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आदर्श ऊर्फ नरसूला मिळाली. यावेळी तो घरात झोपला होता. त्याला कोणीतरी भांडण सोडविण्यासाठी बोलावून नेले. नरसू दोघांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच संतोषने त्याच्याजवळील चाकू काढून त्याला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. दोघात वाद सुरू असल्याने परिसरातील तरुणांनीही गर्दी केली होती. संतोष व नरसू यांच्यात झटापट झाली. यावेळी इतर तरुणही भांडण सोडविण्यासाठी धावले. नरसू मागे हटत नसल्याचे पाहून संतोषने त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, पण छातीवर चाकूचा घाव वर्मी लागल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या झटापटीत रोहित पुजारी, राहुल मुळके, विकी वाघमारे जखमी झाले. संतोष ठोकळे, नितीन ठोकळे व सोनू पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सरोजिनी पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
चौकट
बहिणीसाठी घेतले नवीन कपडे
नरसूचे शिक्षण नववीपर्यंत झाले होते. तो कधी वाढप्याचे काम करी, तर कधी गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे. त्याची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण मिळत असे. दिवाळी तोंडावर आल्याने तो चार ते पाच दिवस गवंड्याच्या हाताखाली कामाला गेला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने स्वत:सह बहिणीसाठी नवीन कपडे घेतले होते.