गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणी तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 03:39 PM2019-05-08T15:39:01+5:302019-05-08T15:42:26+5:30
सांगली येथील कोल्हापूर रस्त्यावरील २२ वर्षीय तरुणीस गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार करून शरीरसंबंधाची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अविनाश संजय पवार (वय १९, रा. पाटवले कुकाना, जि. अहमदनगर) यास शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील २२ वर्षीय तरुणीस गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार करून शरीरसंबंधाची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अविनाश संजय पवार (वय १९, रा. पाटवले कुकाना, जि. अहमदनगर) यास शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. पाटवले कुकाना येथे त्याच्या घरावर छापा टाकून त्यास पकडले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अविनाश पवार याची गतवर्षी या तरुणीशी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली होती. १५ जून २०१८ रोजी त्याने येथील शासकीय रुग्णालय चौकातील लॉजवर तिला बोलावून घेतले. त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध तिला पाजले. त्यामुळे तरुणी बेशुद्ध होऊन पडली.
अर्धवट शुद्धीवर आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. शरीरसंबंध करताना त्याने स्वत:च्या मोबाईलवर छायाचित्रे काढली. तसेच चित्रफीतही बनविली. तेव्हापासून ते ४ मे २०१९ पर्यंत त्याने या तरुणीस ब्लॅकमेल करून सातत्याने तिच्यावर बलात्कार केला.
गेल्या आठवड्यातर त्याने तरुणीची अश्लील छायाचित्रे व शरीरसंबंधाची चित्रफीत इन्स्टाग्रामवर तसेच त्याने तयार केलेल्या यु-ट्यूब लिंकवर प्रसारित केली. हा प्रकार समजताच तरुणीने रविवारी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली होती.
संशयित पवारच्या शोधासाठी सोमवारी सकाळी शहर पोलिसांचे पथक अहमदनगरला रवाना झाले होते. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पथकाने पवारच्या पाटवले कुकाना येथील घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याला घेऊन मंगळवारी पहाटे पथक सांगलीत दाखल झाले.
दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील तपास करीत आहेत.