Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:26 IST2025-04-03T14:26:13+5:302025-04-03T14:26:34+5:30
अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या ...

Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला
अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बोटीतून शोध घेत असताना बुधवारी ( दि. २) भिलवडी येथील हाळभाग येथे युवकाचा मृतदेह आढळून आला. अजित अनिल गायकवाड (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अजित गायकवाड हा मंगळवारी (दि.१) रोजी कृष्णा नदीवर दुपारी १ वाजता पोहण्यासाठी गेला होता. दुपारी घरी न आल्यामुळे घरातील लोकांनी गावात त्याचा शोधा घेतला. बुधवारी सकाळी गावातील लोक नदीवर पोहण्यासाठी गेले असता त्यांना नदी काठावर अजितचे कपडे व चप्पल आढळून आली. नागरिकांनी अजितच्या घरच्यांना माहिती दिली व त्यानंतर संबंधित कपडे व चप्पल अजितचे असल्याचे घरच्यांनी ओळखले.
अजितचा चुलत भाऊ अविनाश बाळासो गायकवाड यांनी अजित हरविला असल्याची तक्रार बुधवारी सकाळी भिलवडी पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर भिलवडी पोलिस व वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ यांनी नितीन गुरव यांच्या मदतीने नदी पात्रात बोटीतून शोधा शोध सुरू केली. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास भिलवडी येथील हाळभाग येथे अजितचा मृतदेह झुडपात तरंगताना आढळला.
अजित गायकवाड हा औदुंबर येथील दत्त देवस्थान समितीचा कर्मचारी होता. वन क्षेत्रपाल संतोष शिरसाटवार, वनपाल सुजित गवते, वनपाल सुरेखा लोहार, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. हारुगडे व पोलिस हवालदार सुनील सूर्यवंशी, स्वप्नील शिंदेंसह ४ होमगार्ड यांनी शोध कामात मदत केली.