जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वायफाय’साठी तरुणांची गर्दी
By admin | Published: November 15, 2015 10:47 PM2015-11-15T22:47:09+5:302015-11-16T00:11:28+5:30
रात्री उशिरापर्यंत गर्दी---नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
सांगली : जिल्ह्यातील सर्वसामान्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय ‘वायफाय’ करीत वाहवा मिळवली खरी, मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. फोर जी इंटरनेटचा वापर करण्यासाठी कार्यालयाचे आवार तरुणांच्या गर्र्दीने अक्षरश: फुलून जात आहे. दिवसभर पन्नासच्या घरात असलेली तरुणांची संख्या रात्री वाढत असून, रात्री दोनशे ते तीनशेजण ‘वायफाय’चा आनंद ‘लुटत’ आहेत. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका खासगी मोबाईल कंपनीच्या मदतीने ‘वायफाय’ सुविधा सुरु करण्यात आली. सेवा सुरु झाल्यापासून आजपर्यंत त्याचा वापर करणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढच होत आहे. सुट्टीच्या दिवसात तर नेहमी सुनसान असणारा या कार्यालयाचा परिसर सध्या गर्दीने फुलून गेलेला असतो. या सेवेच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी, तरुणांनी या सेवेचा उपयोग करुन घेत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार खरोखरच अभ्यासासाठी तरुण या सेवेचा वापर करतात का? हा सवाल कायम आहे. नागरिकांच्या वाहनांवर अक्षरश: झोपून काही युवक नेटचा वापर करतात. त्यामुळे यावरून अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. या सेवेचा तरुणांकडून अतिरेक होत असल्याची तक्रार आता खुद्द कर्मचारीच करीत आहेत. रात्री तर या कार्यालयाच्या परिसरात दोनशेहून अधिक युवकांचा राबता असतो. यात नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून अत्यंत सकारात्मक हेतूने या सेवेची सुरूवात केली असली तरी, मूळ उद्देश बाजूला पडत आहे. (प्रतिनिधी)
रात्री उशिरापर्यंत गर्दी
वायफाय सेवेचा लाभ उठविण्यासाठी दिवसभर तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तळ’ ठोकून असतातच. शिवाय रात्री कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेनंतर तर खरी गर्दी या परिसरात होत आहे. रात्री किमान दोनशेहून अधिकजण या परिसरात या सेवेचा ‘लाभ’ घेत असल्याचे चित्र आहे.