Sangli: कवलापुरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नऊ ग्रामस्थ ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:50 PM2024-06-26T15:50:01+5:302024-06-26T15:50:45+5:30

मृत युवकाकडून तंटामुक्ती अध्यक्षांवर कोयत्याने हल्ला केल्याने संतप्त जमावाकडून मारहाण

Youth killed in mob thrashing in Kavalapur Sangli | Sangli: कवलापुरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नऊ ग्रामस्थ ताब्यात

Sangli: कवलापुरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नऊ ग्रामस्थ ताब्यात

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील (वय ४२) यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. तिघा हल्लेखोर तरुणांपैकी एका अल्पवयीनाला संतप्त ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू ओढावला. सांगली ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी नऊजणांना ताब्यात घेतले. या घडामोडींमुळे कवलापुरात मंगळवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.

संकेत ऊर्फ शुभम चनाप्पा नरळे (वय १७, रा. हनुमान मंदिर, साखर कारखाना परिसर, संजयनगर, सांगली) असे ग्रामस्थ्यांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित ग्रामस्थ आरोपी असे : महेश मोहन पाटील, गजानन तावदारकर, सचिन ऊर्फ पांडुरंग अरुण पाटील, पप्या मोनाप्पा पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, संतोष ऊर्फ बंडा नाईक, विवेक ऊर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील. या सर्व संशयितांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत यास मारहाण करणारे अद्यापि पाच ते सहा जण पसार आहेत. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कवलापुरातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील हे सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळ उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर तिघा तरुणांनी कोयत्याने हल्ला केला होता. अचानक झालेल्या हल्ल्याने पाटील रस्त्यावर कोसळले. गंभीर जखमी झाले. घटना समजताच काही वेळातच परिसरात जमाव जमा झाला. हे पाहून हल्लेखोरांपैकी तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले, तर संकेत नरळे जमावाच्या तावडीत सापडला. त्याला संतप्त ग्रामस्थांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

या मारहाणीनंतर जमावाने त्याला पुन्हा भानुदास पाटील यांच्या तुकाई मळा येथील शेतात नेले. तेथेही पुन्हा बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संकेतला तेथेच सोडून निघून गेले. याची माहिती ग्रामीण पोलिसांनी तातडीने कवलापुरात धाव घेतली. तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमी भानुदास पाटील यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या डोक्यात, हातावर वार झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. जमावाने मारहाण केलेल्या संकेतचा पोलिसांनी शोध घेतला, तेव्हा तो तुकाई मळा येथे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला तातडीने सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी संकेतचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, कवलापुरात सोमवारी रात्रीपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेतली होती. रात्रीपासूनच तपासाची चक्रे गतीने फिरवून संकेतवर हल्ला करणाऱ्या नऊ संशयित ग्रामस्थांना मंगळवारी सकाळी जेरबंद केले. अधिक तपास पोलिस निरिक्षक राजेश रामाघरे आणि सहायक निरीक्षक प्रियांका बाबर करीत आहेत.

गावात कडकडीत बंद

भानुदास पाटील यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कवलापुरात बंद पाळण्यात आला होता. ग्रामस्थांनी दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवले. पाटील यांच्यावरील हल्लेखोरावर कडक कारवाईची मागणी केली.

संकेतसह दोघांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. मयत संकेत हा कोकणात गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करीत होता. त्याचा पाटील यांच्यावर जुना राग होता. हल्ला करणाऱ्यांपैकी दुसरा संशयितही अल्पवयीनच आहे. तर तिसऱ्या संशयिताचे नाव जोतीराम शिवाजी माने (वय २२, रा. कवलापूर, ता. मिरज) आहे. हे दोघे पाटील यांच्यावर हल्ला केल्यापासून पसार आहेत. खुनी हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शाळेतून काढल्याचा राग

संकेत नरळे हा दोन वर्षांपूर्वी कवलापुरातच राहण्यास होता. तो शिकत असलेल्या शाळेत इतर विद्यार्थ्यांसमवेत त्याची सातत्याने भांडणे व्हायची. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांना कल्पना दिली होती. पाटील यांनी संकेतला शाळेतून काढून टाकण्याची सूचना केली होती. त्यानुसार संकेतची हकालपट्टी झाली होती. याचा राग संकेतच्या मनात होता. त्यामुळेच त्याने पाटील यांच्यावर सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला. मात्र, जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचाच मृत्यू झाला.

Web Title: Youth killed in mob thrashing in Kavalapur Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.